डॉ. केतकी पाटलांच्या कार्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

0

लोकशाही संपादकीय लेख

माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील (Dr.Ulhas Patil) यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात जिल्ह्यात आग्रही दिसत आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या अकरा महिन्याच्या खासदारकीनंतर गेल्या दोन तपामध्ये त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न भंगले. त्यातच अलीकडे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमुळे सर्वसामान्य जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढल्या आहेत. डॉ. उल्हास पाटील यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असला तरी सगळ्यांनाच खुश करणे शक्य नाही. त्यामुळे अलीकडे त्यांची प्रतिमा पूर्वीसारखी राहिलेली नाही. नवीन तरुण जनरेशनकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. डॉ. केतकी पाटील यांच्याकडे डॉ. उल्हास पाटलांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाते. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा सुरू आहे.

डॉ. केतकी पाटील यांचा शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी चोपडा तालुका दौरा होता. या दौऱ्यात चोपडा तालुक्याची विविध नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा त्यांनी सत्कार केला. डॉ. केतकी पाटलांच्या या दौऱ्यामागे कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल नव्हते. परंतु अलीकडे सामाजिक कार्यात त्यांच्या वाढलेल्या कार्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल असल्याच्या चर्चेला मात्र उधाण आलेले आहे. डॉ. केतकी पाटील यापूर्वी सत्यजित तांबे यांच्या पदवीधर मतदारसंघातील प्रचारात व्यासपीठावर होत्या. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या प्रचाराच्या व्यासपीठावर डॉ. केतकी पाटील कश्या? असा प्रश्न चर्चेत होता. त्यावेळी डॉ. उल्हास पाटलांवर टीका सुद्धा झाली. कारण डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे असताना त्यांची मुलगी काँग्रेसचे बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराच्या व्यासपीठावर असल्याचे अनेक काँग्रेस प्रेमींना खटकले. परंतु डॉ. केतकी पाटील यांचे सामाजिक कार्य स्वतंत्रपणे जिल्ह्यात विशेषता रावेर लोकसभा क्षेत्रात जोमाने सुरू आहे. त्यामुळे डॉ. केतकी पाटलांचे लक्ष रावेर लोकसभा मतदारसंघावर असल्याचे स्पष्ट दिसून येते.

मध्यंतरी अशाही बावड्या उठल्या होत्या की डॉ. केतकी पाटील या येत्या लोकसभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असतील. राजकारणात अशक्य असे काही नाही. त्यामुळे वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने डॉ. केतकी पाटलांकडून मतदारसंघात विविध कार्याच्या माध्यमातून दौरे वाढले त्यात नवल कसले..! चोपडा तालुका हा रावेर लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्या सत्काराच्या माध्यमातून आपला त्या जनसंपर्क वाढवित आहेत. एवढेच नव्हे तर लग्नकार्यात उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देखील त्या देत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अचंबित झालेले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघ हा लेवा पाटील समाजाच्या उमेदवाराचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. २०१४ आणि २०१९ मध्ये रावेर मतदार संघातून भाजपच्या उमेदवार म्हणून विद्यमान खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या आहेत. खासदार रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्या स्नुषा आहेत. एकनाथराव खडसेंनी भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून रक्षा खडसे असतील, असा तर्क केला जात आहे. या तर्कामागे राजकारण आहे, याची सर्वांना कल्पना आहे. कारण सासरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रक्षा खडसेंकडून प्रवेश करण्याचे कारण काय? त्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तरीसुद्धा रिस्क नको म्हणून भाजपकडून पर्यायी उमेदवाराच्या शोधात असणे काही चुकीचे नाही. म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्या कदाचित भाजपच्या उमेदवारही असतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु डॉ. केतकी पाटील अथवा डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून सुद्धा त्याला दुजोरा मिळालेला नाही आणि त्यांच्याकडून इंकारही करण्यात आलेले नाही.

डॉ. केतकी पाटील या एमडी रेजीओलिस्ट आहेत. कोरोना कालावधीत त्यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा केली आहे. त्यांचे पती डॉ.वैभव पाटील हे सुद्धा डीएम कॅलिफोर्नियातून असून ते मलकापूरचे रहिवासी आहेत. मलकापूर तालुका रावेर लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो, असाही तर्क लावला जात आहे. त्यामुळे येत्या काळात रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात डॉ. केतकी पाटील या अग्रेसर राहतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा अशा प्रकारची संभाव्य उमेदवारासंदर्भातील चाचपणी केली जात असल्याचे बोलले जाते. या माध्यमातून एकनाथ खडसे यांना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. काही झाले तरी रक्षा खडसेंची भाजपशी एकनिष्ठता पाहता रक्षा खडसेच भाजपच्या संभाव्य उमेदवार राहतील. भाजपतर्फे रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली गेली तर डॉ. केतकी पाटील काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्चित राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.