जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. मनीष चौधरी व डॉ. विनोद जैन यांनी अंटार्टिका धाडसी मोहिमेचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करीत अनुभव कथन केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर रोटरी वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे, प्रकल्प सचिव देवेश कोठारी, रोटरी इलाईटचे अध्यक्ष संदीप झंवर, प्रकल्प सचिव धर्मेंद्र भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.चौधरी व डॉ.जैन यांनी अनुभव सांगताना १७ दिवसांपैकी १२ दिवस प्रवास व ५ दिवस प्रत्यक्ष मोहीम होती असे सांगून, जळगाव ते मुंबई येथून इस्तंबूल ते चिली पर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. सिल्वर सी क्रूझद्वारे त्यांनी केलेल्या अंटार्टिका मोहिमेची माहिती देत यात धाडसी व हौशी असे दोन प्रकार असतात ते सांगितले. जगातील शेवटच्या टोकाला जाऊन, कमी वेळेत लगेच बदलणाऱ्या हवामानासमवेत तसेच जगातील सर्वात कठीण समुद्र याबद्दल दोघांनी रोमांचकारी किस्से सांगितले.
पेग्विनचे हजारोंच्या संख्येत झालेले दर्शन, सुदैवाने सूर्यप्रकाशामुळे झालेली त्यांची मोहीम, रात्री व्याख्यानाद्वारे मिळालेले मार्गदर्शन याबद्दल माहिती दिली. आवश्यक त्या वैद्यकीय परवानगी घेऊन व स्वतःचे संमती पत्रक देत डॉ. विनोद जैन यांनी उणे तापमानात बर्फावर यशस्वीपणे उडी मारली असे सांगून मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल आम्ही तिथे भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला असे ते म्हणाले. या यशस्वी मोहिमेबद्दल डॉ. चौधरी व डॉ. जैन यांचा रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास दोन्ही रोटरी क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


