लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दरम्यान आज महापालिकेच्या विशेष महासभेत ही निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून जि. प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या.
महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधु विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले होते.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती आणि राजकीय वातावरण उत्साहाचे दिसून आले. यावेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालाणी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तर महिला बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे यांची उपस्थिती होती.
शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, समिती सदस्य प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह नगरसेवक प्रवीण कोल्हे व पियुष कोल्हे यांनी उपस्थित राहून उमेदवारांना पाठबळ दिले. डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या रूपाने अभ्यासू नेतृत्व स्थायी समितीवर आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर अनुभवी सिंधु कोल्हे यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीची सूत्रे गेल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीत नवा उत्साह संचारला आहे.

