लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईत पार पडलेल्या विरोधकांच्या भव्य ‘गर्जना मोर्च्यात’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. “हा मोर्चा म्हणजे केवळ राजकीय आंदोलन नसून हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित जनसागराचे आभार मानले.
आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली होती. मात्र, आज ते देशात हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही हुकूमशाह बनणार असाल, तर जनता तुमची ही हुकूमशाही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारचे हत्यार बनले असून ते अडाण्यासारखे काम करत आहेत. ज्ञानेश कुमार म्हणजेच अडाणी कुमार आहेत. त्यांना दिलेले सुरक्षा कवच तर राष्ट्रपतींपेक्षाही जास्त आहे. देश काय ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा आहे का?
सगळ्या संस्थांचे उत्तम उदाहरण म्हणजे आयुक्तांची नेमणूक. राष्ट्रपतींची निवडणूक होते, मग मुख्य निवडणूक आयुक्तांची का होत नाही? आधी या प्रक्रियेत सरन्यायाधीश (CJI) होते, पण सरकारने कायदा बदलून त्यांना बाहेर काढले. राहुल गांधी यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना थांबण्याचे आवाहन केले होते, तरीही सरकारने पक्षपातीपणा करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांची तातडीने नेमणूक करून टाकली, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
देशभरातून तब्बल १३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर नावे हटवण्यात आली असून लोकांनी पुनर्नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी सतत ‘तारीख पे तारीख’ पडत आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयुक्तांचा नाही, तर तो देशाच्या गृहमंत्र्यांचा आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आपण भाजपसोबत होतो. त्यांनी काँग्रेस भ्रष्ट असल्याचे वातावरण तयार केले. पण आज देशात ‘इंडिया अगेन्स्ट वोट चोर सरकार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे काँग्रेसच्या काळात घडले नाही ते यांनी केले. आज देशात जेवढ्या शिव्या या पंतप्रधानांना पडत आहेत, तेवढ्या इतिहासात कोणालाही पडल्या नव्हत्या.
देशाचे सैन्य हे भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर जाते. मात्र, अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिला मुख्यमंत्र्याविरुद्ध (ममता बॅनर्जी) फौज घुसवावी, ही कसली लोकशाही? ही लोकशाही नसून सूडाचे राजकारण सुरू आहे असा हल्लाबोल केला. सरकार सांगते की आम्ही बांगलादेशी शोधत आहोत. देशाच्या सीमा जर सुरक्षित आहेत, तर हे बांगलादेशी महाराष्ट्रात घुसतातच कसे? सुवेंदू अधिकारींसारखे गद्दार नेते लोकांची नावे मतदार यादीतून बाद करण्याची आणि रेशन बंद करण्याची धमकी देत आहेत.
या सरकारने कसल्या कसल्या चोऱ्या केल्या आहेत. त्यांनी राम मंदिरातील दान चोरी केले आणि आमचा मूळ पक्षच चोरला. चोरी करायची आणि पोलीसही आपलेच ठेवायचे, असा यांचा प्रकार सुरू आहे. पूर्णेकरांसारख्या नेत्यांची हत्या होत आहे आणि देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. तुमचे सरकार नेमके कुठे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आक्रमक होण्याचे आवाहन केले. “आज प्रचंड ऊन आहे, सूर्य आग ओकत आहे. पण जोपर्यंत तुमचे डोके तापत नाही, तोपर्यंत या देशात बदल घडणार नाही. हा आपला पहिला मोर्चा आहे, हा शेवटचा नाही. या सत्ताधीशांचे गुढघे टेकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही,” असा इशारा देऊन त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

