जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सीबीआयकडून जळगाव जिल्ह्यातील काही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रशिया, युक्रेन, चीन व नायजेरिया या देशात एमबीबीएस करणाऱ्या डाॅक्टरांना भारतात प्रॅक्टीस करावयाची असल्यास त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (Foreign Medical Graduate Interns) ही परीक्षा पास हाेणे आवश्यक असते. मात्र देशात अशी परीक्षा पास न करता सुमारे २३ हजार डाॅक्टर्स प्रॅक्ट्रीस करीत असल्याची माहिती राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला (एनएमसी) प्राप्त झालेली आहे.
याबाबत नॅशनल आॅफ एग्झामिनेशनने आराेग्य मंत्रालयाकडे माहिती दिली हाेती. तसेच एनएमसीने तीन महिन्यांपूर्वी सीबीआयकडे तक्रार केली हाेती. याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून यातील ७३ डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सीबीआयच्या या धडक कारवाईने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात या प्रकारचे पाच डाॅक्टर कार्यरत आहेत. त्यांची सीबीआय पथकाने गेल्या महिन्यात चाैकशी केली. त्यापैकी एका डाॅक्टरविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्याला दिल्ली येथे चाैकशीसाठी बाेलावण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे.
तसेच आयएमएने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विनापरवाना बेकायदा प्रॅक्ट्रीशनर्सची संख्या ३० पेक्षा जास्त असून हे प्रॅक्ट्रीशनर्स प्रामुख्याने शहर, तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्ट्रीस न करता पेरीफेरीत दवाखाने सुरु करत असल्याची बाब समाेर आली आहे. दरम्यान सीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एफआयआर नुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक अशोक पाटील (सुप्रभा कॉलनी धुळे रॉड, अमळनेर), डॉ. निलेश किशोर पाटील (चिमठाणा,ता.शिंदखेडा जि.धुळे) या दोघांनी चीनमधून एमबीबीएस पूर्ण केले मात्र एफएमजीई परीक्षा नापास झाल्यानंतरही दोघांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्ट्रीस सुरु केल्याचा आरोप असल्याने सीबीआयने १२० ब, ४२०,४६७,४६८, ४७१ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.