मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. यापूर्वी शुल्क वसूल केले असल्यास ते तातडीने परत करावे, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, पेपरफुटी रोखण्यासाठी उपाययोजना, निकाल प्रक्रियेतील सुसूत्रता, डिजिटल पदवी प्रमाणपत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विद्यार्थी निवडणुकांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
अभियांत्रिकीसह सर्व संबंधित महाविद्यालयांना निर्देश
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व संबंधित महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आकारू नये, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. यामध्ये अभियांत्रिकी, कला तसेच विभागाच्या अखत्यारीतील अन्य महाविद्यालयांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून आधीच शुल्क घेतले असल्यास ते परत करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई
विद्यापीठांच्या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. परीक्षा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
परीक्षेतील गैरप्रकार किंवा पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्यांना संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे परीक्षा व्यवस्थापनात विद्यापीठांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
निकाल लागताच पदवी प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये
पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांचे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. या सुविधेमुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत मिळतील. प्रमाणपत्रांसाठी वारंवार विद्यापीठांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील.
२०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक
राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या शैक्षणिक कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुनर्परीक्षा आणि एटीकेटीसंदर्भातील नियमांमध्येही राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये एकसमानता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी एकसमान धोरण तयार केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा, निकाल आणि पुढील शैक्षणिक प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता मिळेल.
विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वसतिगृहांत मुक्काम
विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील १५ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यातील विद्यापीठांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांसोबत वसतिगृहात मुक्काम करून निवास, भोजन, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांची पाहणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनाही जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.
विद्यार्थी निवडणुकांबाबत अंतिम अहवालाचे निर्देश
राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या दृष्टीने दिवाळीनंतर प्रक्रिया पुढे नेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निवडणुका कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे घेता येतील, याचा सर्वंकष विचार करून अंतिम अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, याला शासनाचे प्राधान्य असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.

