कर्तुत्वाची जोड नसेल तर “परिसस्पर्श” ही फक्त ‘म्हण’ ठरते – डॉ. राजेश राजपूत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि. २८ मार्च २०२२ रोजी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ३ दिवशीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमालाचे उद्घाटन संपन्न झाले.

कार्यक्रमास अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, कार्यक्रमाचे उद्घाटक फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील लेफ्टनंट कमांडर डॉ. राजेश राजपूत, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ. शाम सोनवणे, कार्यक्रम समन्वयक महिला अधिकारी डॉ. सुनिता चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. शाम सोनवणे यांनी विद्यापीठाच्या निर्देशानुसार विद्यार्थी विकास विभाग हा प्रत्येक महाविद्यालयात कार्यरत आहे. या ३ दिवशीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमालाचे आपण आज लेफ्टनंट कमांडर डॉ. राजेश राजपूत यांच्या हस्ते उद्घाटन करीत आहेत. विद्यार्थी मित्रहो आपणास पुढील ३ दिवशीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमालेत एकुण १० वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान होणार आहे.

१) विषय – भाषण संभाषण सूत्रसंचालन कौशल्य. वक्ते- लेफ्टनंट कमांडर डॉ. राजेश राजपूत.
२) विषय – लिंग समभाव
३) विषय – राष्ट्रिय एकता व एकात्मता. वक्ते- दर्शना पवार, सचिव साने गुरुजी कर्मभूमी स्मारक अमळनेर.
४) विषय- रोजगाराच्या संधी वक्ते – विजय सैंदाणे MCD जिल्हा समन्वयक जळगाव.

दिनांक २९/०३/२२ रोजी
५) विषय – जातीय सलोखा वक्ते – डॉ. दिपक सोनवणे. समाजकार्य विभाग कबचौ उमवि जळगाव.
६) विषय – स्पर्धा परीक्षा वक्ते – डॉ. सत्यजित साळवे. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव.
७) विषय – सोशल मीडिया वक्ते- डॉ. संजय पाटील. पंकज महाविद्यालय चोपडा.

दिनांक ३०/०३/२२ रोजी
८) विषय – ताण तणाव मुक्त परीक्षा वक्ते – डॉ. सी पी लभाणे प्रोफेसर मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव.
९) विषय – बेटी बचाव बेटी पढाव वक्ते – विद्या सोनार समुपदेशक आधार संस्था अमळनेर.
१०) विषय – व्यक्तिमत्व विकास वक्ते – डॉ. विवेक काटदरे प्रोफेसर कबचौ उमवि जळगाव.
तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

उद्घाटकीय मनोगतात लेफ्टनंट कमांडर राजेश राजपूत यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंची अंगे सुस्पष्ट करून सांगितली. उज्वल भविष्यासाठी संघर्ष हा अटळ आहे. उद्देश साध्य करण्यासाठी दोन घटक किंवा दोन व्यक्ती एकमेकांसोबत घर्षित झाल्यानंतरच नाविन्य प्रारूपाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ धावपटुला धावण्याच्या शर्यतीत प्राविण्य मिळवायचे असेल तर अचुक मार्गदर्शना सोबतच धावण्यासाठी लागणारी आत्मशक्ती ही ऊर्जित करावी लागते. धावण्यासाठी त्या धावपटुला रोजच्या सवयींमध्ये बदल करणं क्रमप्राप्त आहे‌. म्हणजेच कर्तुत्वाची जोड नसेल तर “परिसस्पर्श” ही फक्त ‘म्हण’ ठरते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी विद्यार्थी विकास विभागा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त व कलागुणांना वाव मिळावा. आजच्या स्पर्धेच्या युगात त्यांना अभ्यासक्रमा सोबतच तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे. या हेतूने विविध ४५ विविध उपक्रम या विभागाच्या माध्यमातून कार्यान्वित आहेत. याचाच एक भाग म्हणून “व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाला” या निमित्ताने आपण आज जमलो आहोत.

विद्यार्थी मित्रहो covid-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाविद्यालये ही इंटरनेटच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले होती. मागील दोन वर्षात त्याकडे आपण पर्याय म्हणून बघितले. परंतु आता प्रत्यक्ष महाविद्यालयात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एक नवे चैतन्य आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुस्पष्ट होताना दिसते आहे. विद्यार्थी विकास विभागाच्या या व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाले अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणां सोबतच, तुमच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यातून एक चांगला सामाजिक कार्यकर्ता घडण्यासाठी हि व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण ठरेल.

मित्रहो भविष्यात पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर विविध शासकीय प्रशासकीय स्तरावर समाजकार्य मध्यस्थीच्या साह्याने तुम्ही या उभय समाजातील असंख्य प्रश्न शोधण्यासाठी व ते सोडवण्यासाठी कार्यक्षम व्हावे ही आशा व्यक्त करतो. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.