व्यापाऱ्यांची ‘दिवाळी’ अन् शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’!
केळीला कवडीमोल भाव : व्यापाऱ्यांकडून ‘कापूस कोंडी’ : लोकप्रतिनिधींचे मात्र मौन
दीपक कुलकर्णी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरात केळी उत्पादनात आघाडीवर असलेला जळगाव जिल्हा सध्या गंभीर संकटाच्या फेऱ्यात सापडला आहे. अतिवृष्टी, बाजारातील भाव कोसळणे आणि व्यापाऱ्यांकडून सुरु असलेली लूट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना केळीच्या बाजारभावात प्रचंड घसरण होत आहे. त्यामुळे मेहनतीने केळी उत्पादन करणाऱ्या बळीराजाला आता त्याच्या श्रमाचा मोबदला मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या केळीचा बोर्ड भाव 1800 रुपये असतांना देखील व्यापारी प्रत्यक्षात मात्र 400 रुपये दर देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कापसाचे देखील दर पाडल्याने कापूस उत्पादक कोंडीत सापडले आहेत.
चांगल्या प्रतिच्या केळीसाठी निश्चित केलेला बोर्ड भाव प्रति क्विंटल 1800 रुपये इतका असताना, प्रत्यक्ष बाजारात व्यापाऱ्यांकडून केवळ 400 रुपये भाव दिला जात आहे. हा तब्बल 1400 रुपयांचा फरक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणारा आहे. व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची संघटीत पद्धतीने लूट सुरु असून, भाव पाडण्यासाठी संगनमताने व्यवहार सुरु असल्याचे बोलले जात आहे. व्यापाऱ्यांकडून केळी घड वाहतुकीसाठी प्रत्येक घडामागे 8 ते 10 रुपये आकारले जात आहेत. हा खर्च व्यापाऱ्यांचा असताना तोही शेतकऱ्यांवर टाकण्यात येत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढतच असून, मिळणारा नफा कमी-कमी होत अखेरीस तोटा पदरात पडत आहे.
जिल्ह्यात अलीकडील काळात हवामानातील अनियमिततेचा देखील केळी उत्पादकांवर मोठा परिणाम झाला आहे. काही भागांत सततच्या पावसामुळे घड वेळेआधीच झाडावर पिकू लागले आहेत. परिणामी, घडांचे वजन कमी होणे, साठवणूक योग्य न होणे आणि विक्रीसाठी योग्य दर्जा न मिळणे अशी संकटांची मालिकाच सुरु आहे. केळी उत्पादनासाठी शेतकऱ्याला खत, पाणी, औषधे, मजुरी, वाहतूक इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र शेवटी जेव्हा बाजारात फळ विकायचे असते, तेव्हा व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक भाव पाडले जात असल्याने शेतकऱ्याचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे.
या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांची ‘दिवाळी’ होत असताना शेतकऱ्यांवर ‘संक्रात’ आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुका आल्या की मतांसाठी धावणारे नेते, सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून चार हात लांबच राहात असल्याचे दिसून येत आहे.
कापूस उत्पादकही अडचणीत
जिल्ह्यात केवळ केळीच नव्हे, तर कापूस उत्पादक शेतकरीही मोठ्या अडचणीत आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर ‘कापूस कोंडी’ झाल्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीकडे पाठ फिरवली. परिणामी, या वर्षी कापसाचा पेरा कमी झाला असला तरीही बाजारात मागणी तितकीशी वाढलेली नाही. सध्या कापसाला सरासरी प्रति क्विंटल 6500 रुपये इतका भाव मिळतो आहे. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात व्यापाऱ्यांकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी भाव पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीचा कुठेच योग्य अंमल होताना दिसत नाही. व्यापारी दलाल आणि काही खरेदी केंद्रांतील कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.