लोकशाही संपादकीय लेख
भारतात विविध जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात. वर्षभरात अनेक सण उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी सणाला सर्वच सणांचा राजा म्हणतात. दिवाळी सण हा प्रकाशाचा सण म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य जनतेपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच जण दिवाळी सणाचा आनंद लुटतात. खेड्यापासून शहरापर्यंत, दलित आदिवासी वस्त्यांमध्ये देखील दिवाळी सण आनंदाने साजरा केला जातो.
गाईगुरांची वारस पासून, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी सतत पाच दिवस हा दिवाळी सण साजरा केला जातो. पाच दिवसात गोड धोड वस्तू करणे, घरासमोर सडा आणि रांगोळी सजवणे, पणत्यांनी लखलखाट करणे, फटाके फोडून आतिषबाजी करणे, नवीन कपडे परिधान करून या उत्साहात आपण सारेच सामील होतो. प्रकाशाचा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे.. “तमसो मा ज्योतिर्गमय..” म्हणजे आपल्या जीवनात असलेला अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणे, हाच या दिवाळी सणाचा खरा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे सण उत्सव जरी साजरे होत असले, तरी दिवाळी सणाला सणांचा राजा म्हणून संबोधले जाते, हे विशेष होय.
दिवाळी सण सर्वांनी अत्यंत उत्साहात साजरा करा.. दिवाळी सणाचा आनंद लुटा.. आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रगतीच्या प्रकाश निर्माण करा.. दिवाळी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा… यंदाची दिवाळी उत्साहाबरोबरच राजकीय लोकशाहीचा उत्सवही सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. दिवाळी सणाचे फटाके संपताच येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होऊन विजयाच्या फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आमदार निवडण्याची संधी महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर पुढचे पंधरा दिवस प्रचाराची धूमधाम सुरू होईल. विविध पक्षाचे कार्यकर्ते प्रचारार्थ तुमच्याशी संपर्क साधतील, आपल्यालाच मतदान करा म्हणून भावनिक साथ घालतील, कुठल्याही भावनेला बळी पडू नका. सदसदविवेक बुद्धीने मतदान करा.. योग्य उमेदवारालाच मतदान करा.. अनेक पक्षाकडून काही अमिष तुम्हाला दाखवण्यात येईल. त्या कसल्याही आमिषाला बळी पडू नका.. लोकशाहीमध्ये मतदानाचा एकमेव अधिकार तुम्हाला मिळालेला आहे. त्या मतदानाचा योग्य उपयोग करा. हेच या दिवाळी सणाच्या उत्साहाच्या निमित्त आणि लोकशाहीच्या उत्सवानिमित्त सर्व मतदार बंधू-भगिनींना कडकडीचे आवाहन करण्यात येत आहे. दिवाळी सणाचा उत्सव आणि निवडणुकीच्या लोकशाहीचा उत्सव यंदा योगायोगाने एकच आला आहे. म्हणून दिवाळीच्या सणाबरोबरच निवडणुकीच्या उत्साहात सहभागी होऊन आपल्या एक बहुमुल्य मताचा अधिकार किती महत्त्वाचा आहे, हे राजकारणांना कळू द्या. हे आपल्याला नम्र आवाहन करण्यात येत आहे..
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे अति पावसामुळे शेतकऱ्यांचा मका कापूस, सोयाबीन आदी पिकाचे मोठे नुकसान झाले. हातात आलेल्या शेतकऱ्यांचा घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडले. या शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी चांगली जाण्यासाठी मदत करावी, ही विनंती. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात एवढा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला, तरी अनेक खेडेगावात आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. ही विषमतेची स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी शासनाकडून योग्य ते नियोजन झाले पाहिजे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपल्याकडे मते मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधीला या परिस्थितीची जाणीव करून द्या आणि त्यांच्याकडून ही विषमतेची स्थिती बदलण्याचे आश्वासन मिळेल त्यांनाच आपले बहुमूल्य मतदान करा. तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे बेरोजगार तरुण तसेच त्यांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत. रोजगार उपलब्ध करून तरुणांना कामाला लावण्यासाठी जे आश्वासन देतील, त्यांनाच मतदान करा. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. महाराष्ट्राला देशात एक सुसंस्कृत राज्य म्हणून ओळख आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होतो आहे. अलीकडे तर.. “हाच का तो फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र..?” असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. राजकारणाचा दर्जा घसरला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या राजकारणांना धडा शिकवा. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून द्या आणि पूर्वीचे वैभव असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा आणलेले आपण पाहूया.. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आनंदाची, सुखाची, समाधानाची आणि आरोग्याची जावो, हीच शुभकामना.. दिवाळी सणाच्या फटाक्यांच्या आतिषबाजी नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विजयी उमेदवारांच्या फटाक्यांची आतिषबाजी आपण करूया…!