लोकशाही विशेष लेख
आजच्या २१ व्या, संगणकीय तसेच विज्ञान युगात जगातील घटणारी मुलींची संख्या बघता प्रत्येक पती-पत्नीला वाटत असते की, आपल्याला मुलगाच व्हावा. मुलगा होण्यासाठी पती-पत्नी व त्यांच्या घरातील इतर सदस्य हे देवाला साकडे घालून नवस करत असतात. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो असे सर्वच जण ९९ टक्के लोकं समजतात. तो आपल्या वंशाला पुढे नेईल व आपला वंश टिकून राहील व आपण वयोवृद्ध झालो तर मुलीला विवाहाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हुंडा द्यावा लागेल असे जगातील काही पती-पत्नीला वाटत असते.
मुलगी झाल्यावर एखादे दाम्पत्य किंवा त्यांच्या अगदी जवळ असलेले नातेवाईक नाराज होतात. व मुलगी झाली असे नाराजीने इतरांना सांगत असतात. परंतु मुलगा झाल्यावर संपूर्ण परिवाराला व पती-पत्नीला गगनात मावेनासा आनंद होतो. सर्वत्र पेढे वाटले जातात व अशा प्रकारे जन्म घेणार्या मुलाचे कौतुक केले जात असते. त्याच्या बारश्याचा मोठा कार्यक्रम केला जातो व त्यामध्ये अनेक खाद्य पदार्थही असतात. अशा प्रकारचे स्वागत जन्मलेल्या मुलाच्या घरातील सर्वच सदस्य करत असतात.
परंतु माझ्या मते, मुलगा हा तर वंशाचा दिवा आहेच परंतू मुलगी ही वंशाची पणती का नाही होवू शकत? मुलगी देखील वंशाची पणती होवू शकते. मुलगी ही सासर व माहेर या दोन्ही घरांना प्रकाशमान करते. त्याचप्रमाणे मुली पासूनच स्त्री तयार होते. व त्याच स्त्रीच्या गर्भातून मुलगा, मुलगी हे जन्म घेत असतात. परंतु वर्तमान काळात चोरुन-लपून लिंग परिक्षण केले जाते व मुलीचा गर्भ राहिल्यास त्यास गर्भपात केला जात असतो. असे प्रकार मुलीबद्दल होत असतात.
अशामुळे भविष्य काळात विवाहाच्या वेळी वराला वधु मिळणार नाही व अशामुळे विनय भंगाचे प्रकार जास्त प्रमाणात वाढत जातील. असे अनेक कारणे आहेत की जे मुलगी न झाल्यामुळे होत असतात. म्हणून ज्याप्रमाणे मुलगा वंशाचा दिवा मानला जातो, त्याचप्रमाणे मुलगी वंशाची पणती मानावी तरच जगातील घटणारी मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल.

चाळीसगाव, जि. जळगाव.
मो. ९८९०७०३४८५