लोकशाही संपादकीय लेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील युती संदर्भात बैठका सुरू आहेत. जागा वाटपाचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवस बाकी असले तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीवरून भाजप 50 आणि शिवसेना 25 असे जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. असे म्हटले जात असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी अद्याप बोलणे पूर्ण झालेली नसल्याने तिढा कायम आहेत. दरम्यान महाविकास आघाडीची मात्र युती झाल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संतोष चौधरी यांच्यात युतीची बोलणी पूर्ण झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 38 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागांचे वाटप ठरले आहे. त्यात मनसेला लागणाऱ्या जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातून द्यायच्या आणि बाकी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच इतर विरोधी पक्षांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोट्यातून जागा देऊन त्यांची युती करायची असे सूत्र ठरल्याचे संजय सावंत यांनी सांगितले. त्यामुळे जागा वाटपात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या वतीने अद्याप जागा वाटपाचा घोळ सुरू असल्याने तेथे ऐनवेळी बंडखोरी होण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग झाल्याने भाजपला जागा वाटपात फार मोठी कसरत करावी लागते आहे. दरम्यान भाजपमध्ये जागा वाटपात कसलाही वाद नाही, असे भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार दिनांक 30 डिसेंबर असली तरी अद्याप म्हणावे तसे अर्ज दाखल झालेले नाहीत. सोमवार दिनांक 29 आणि मंगळवार दिनांक 30 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होतील, असे चित्र आहे. दरम्यान भाजप तर्फे निष्ठावंतांना तसेच भाजप मधील निवडून येणाऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले असल्याचे कळते. बंडखोरी होऊ नये म्हणून गुप्तता पाळली जात आहे. 50 आणि 25 असा भाजप आणि शिवसेनेच्या फॉर्मुला ठरला असला तरी तो जागा वाटपाचा अंतिम निर्णय नाही असे समजते. त्यामुळे प्रत्यक्षात 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच भाजप शिवसेना यांच्यातील वाटपाचे चित्र स्पष्ट होईल असे दिसते. त्यात अजित पवार गटाशी युती होते की बिघाडी होते, यावरही उलट सुलट बोलणी चर्चा चालू आहे. जळगाव महापालिका निवडणूक यंदा जोरदार गाजणार असल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो महापालिका निवडणुकीतही राहणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले असल्याने 2018 च्या जळगाव महापालिका निवडणुकीत जेवढा जेवढ्या 57 जागा भाजपने जिंकल्या तेवढ्या किमान 57 पेक्षा जास्त जागा आता या निवडणुकीत भाजपला हव्या आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट जागा वाटपात दोन पाऊल मागे जाऊ शकतो असे सांगण्यात येते. एकंदरीत जागा वाटपावरून भाजपामध्ये रणकंदन होण्याची दाट शक्यता आहे. दोनच दिवसात हे चित्र स्पष्ट होईल..!