५० कावळ्यांच्या मृत्यूनंतर १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट
बर्ड फ्ल्यूचा शिरकाव : लातूर नंतर रायगडात शिरकाव
लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या चार दिवसापूर्वी उदगीर शहरात अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या कावळ्यांच्या मृत्यू बाबत नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यावर हे मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निदान झाले. अश्यात रायगडात घरगुती कोंबड्यांना लागण झाली असून जिल्ह्यात आतापर्यत १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. यामुळे धोका वाढला असून अनेक ठिकाणी कोंबड्यांना लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे अहवालातुन समोर आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना लागण झाली असून तसा अहवाल भोपाळच्या पशुरोग प्रयोग शाळेने दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून सतर्कता म्हणून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील १ हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट देखील लावण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. यामुळे १ किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरातील चिकनची दुकान ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कावळ्याच्या मृत्यू झालेल्या परिसरात दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन करण्यात आला आहे. तर बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत. नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येते आहे.