आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद? : गुलाबराव म्हणाले निर्णय श्रेष्ठींकडे
जळगाव : शिवसेनेच्या शिंदे गटात संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात असताना, त्यात आमदार पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचक प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळविल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात अलीकडे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे राजकीय वजन वाढल्याचे सांगितले जाते. तशात त्यांच्या खांद्यावर पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाचीही जबाबदारी टाकली आहे. त्यानंतर आता आमदार पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे. खुद्द आमदार पाटील यांनी पाचोऱ्यातील एका मेळाव्यात बोलताना, मंत्रिपद मागावे लागत नाही, ते आपोआप मिळते असे वक्तव्य केल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना अधिकच धार आली आहे. अशा स्थिती, जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटातील प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाबाबतही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल झाल्यास काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल किंवा काहींना वगळले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदावर गदा येऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत विचारणा केली. तेव्हा पालकमंत्री पाटील यांनी सावध भूमिका घेत, प्रत्येकाला मंत्री होण्याची इच्छा असते. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेतून त्यांनी किशोर पाटील यांची मंत्रिपदाची थेट दावेदारी टाळली असली तरी, संधी मिळाल्यास ते मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले. जिल्ह्यातील राजकारणात किशोर पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वर्चस्वाची स्पर्धा ही नवीन नाही. दोन्ही नेते आपापल्या मतदारसंघात प्रभावी असून, संघटनात्मक पातळीवरही त्यांची पकड मजबूत आहे. मात्र, किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारीमुळे ही स्पर्धा आता अधिक उघडपणे समोर येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर दोघांचे समर्थक सक्रिय झाले असून, पक्षश्रेष्ठींच्या आगामी निर्णयावर त्यांच्या राजकीय भविष्याची दिशा अवलंबून राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, शिंदे गटातील अंतर्गत बदल, प्रादेशिक समतोल राखण्याची गरज आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी या सर्व घटकांमुळे हा विस्तार लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातून कोणाला संधी मिळते आणि कोणाची गछंती होते, यावरून पुढील राजकीय समीकरणे निश्चित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


