धावत्या कारने घेतला पेट, सुदैवाने सहा जण बचावले

 लोकशाही न्यूज नेटवर्क

फर्दापूर (Fardapur) जवळ मोठी दुर्घटना टळली. फर्दापूर येथील बसस्थानकाजवळ असलेल्या पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. याप्रसंगी चालकाच्या सावधगिरीने कारमधील ६ जण खाली उतरल्याने जीवितहानी टळली.

भुसावळ येथून कारने (एमएच २० डीजे २१०७) अभिजित नरवडे (रा. गजानन महाराजनगर, भुसावळ) हे भुसावळवरून औरंगाबादला वडील भारत नरवडे, आई, बहीण, चार वर्षांची भाची व एक नातेवाईक महिला असे एकूण सहा जण मावशीच्या मुलीच्या लग्नाला जात होते.दरम्यान कार फर्दापूरला आल्यावर कारमधून अचानक धूर येत असल्याचे अभिजित नरवडे यांना दिसले.

याप्रसंगी त्यांनी कार बसस्थानकाजवळील पुलावर थांबवली व कारचे बोनेट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उघडले नाही व आग सुरू झाली. यावेळी त्यांनी सावधगिरी बाळगत तात्काळ कारमधून सर्वांना बाहेर काढले.

तसेच सर्व सामान बाहेर काढले. त्यांनी जवळच असलेल्या भारत पेट्रोल पंपावर जाऊन अग्निरोधक यंत्र आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व कार खाक झाली. दरम्यान, कारमालकाचे सात लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने येथे काहीवेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here