धरणगाव नगरपरिषदेचा उपक्रम : महाराजस्व समाधान शिबीर व महास्वच्छता अभियानाचे आयोजन
धरणगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव नगरपरिषदेच्यावतीने “सेवा पंधरवडा” व “स्वच्छता ही सेवा – २०२५” या शासन उपक्रमांअंतर्गत दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक २६ सप्टेंबर रोजी तर “महास्वच्छता अभियान” दिनांक २७ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
महाराजस्व समाधान शिबीर : २६ सप्टेंबर
धरणगाव नगरपरिषद कार्यालयात संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत आयोजित या शिबिरात नागरिकांना अभय योजना व मालमत्ता कर आकारणी, नवीन नळ कनेक्शन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आदी सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. नागरिकांना पात्रता, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शनाची सुविधाही दिली जाणार आहे.
महास्वच्छता अभियान : २७ सप्टेंबर
सकाळी ७ वाजल्यापासून संपूर्ण शहरभर राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत शाळा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा व रुग्णालय परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षकवर्ग, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्लास्टिक मुक्ती, कचरा वर्गीकरण, जनजागृती फेरी, पोस्टर प्रदर्शन आणि नारेलेखन यांसारखे कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.
या दोन्ही उपक्रमांचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, यावेळी विविध योजनांचा शुभारंभ व लाभवितरण करण्यात येईल.नगरपरिषदेने सर्व नागरिक, शाळा, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांना आवाहन केले असून, या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


