बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचं निधन
८९ व्या वर्षी जीवनप्रवास संपला; सिनेसृष्टीत शोककळा
मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं आज वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं. आज, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांवर आलेल्या ८ डिसेंबरच्या ९०व्या वाढदिवसापूर्वीच ते जगताचा निरोप घेऊन गेले. निधनाची वार्ता कळताच देओल कुटुंबीयांनी दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांचं पार्थिव विलेपार्ले येथील स्मशानभूमीत आणलं. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान यांसह अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.
सहा दशकांहून अधिक काळ आपल्या तेजस्वी अभिनयाने इंडस्ट्री गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. ‘फूल और पत्थर’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘यादों की बारात’, ‘नौकर बीवी का’, ‘पत्थर’, ‘घायल’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
२०१२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ‘इक्किस’ येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, आता तो त्यांचा निरोपाचा पडदा म्हणून चाहत्यांसमोर उरणार आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अजरामर कलाकार गमावला आहे.
जीवन आणि कारकिर्द
धर्मेंद्र (पूर्ण नाव धर्मेंद्र के कृष्ण देओल) यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नारसळी गावात झाला.
१९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयातील पदार्पण केले.
पुढे “शोले” (१९७५) यांसारख्या सिनेमांनी त्यांना “ही-मॅन” म्हणून ओळख मिळाली.
त्यांनी सुमारे ३०० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, ज्यामुळे ते हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पात्र बनले
त्यांनी राजकारणातही प्रवेश केला आणि २००४ ते २००९ पर्यंत लोकसभेचे सदस्य राहिले.