विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धानोरा येथील घटनेने हळहळ

0

धानोरा ता. चोपडा लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला घरी परतताना विद्युत वायरला स्पर्श झाल्यामुळे त्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिल भिला कोळी (वय २७, रा.धानोरा ता.चोपडा) मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेती काम करून तो आपल्या कुटुंबीयांसह उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शुक्रवारी जनावरांसाठी चारा घेण्याकरिता शेतामध्ये गेला होता. त्याच्यासोबत एक लहान बालक होता. चारा डोक्यावर घेऊन घरी परतत असताना विद्युत वायरचा त्याला स्पर्श झाल्याने, त्याच्या अंगात विद्युत प्रवाह शिरल्याने त्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली. अनिल कोळी याला तातडीने धानोरा उपकेंद्र व तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले या वेळेला अनिल कोळी यांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात धानोरा ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरू होते.मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.