धानोरा वीज वितरण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष!
परिसरातील शेतकऱ्यांची कार्यालयावर धडक : अभियंत्यांना दिले निवेदन
धानोरा, ता. चोपडा
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून शेतीला पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहेत.
शनिवारी सकाळी परिसरातील मितावली येथील शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता अशोक कुळकर्णी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिलले. परिसरातील गावांमध्ये येथील वीज वितरण कंपनीद्वारे वीज पुरवठा केला जातो; मात्र तो वारंवार खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या उद्भवत आहे. वारंवार मागणी करुनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे. शेतीला सलग वीज पुरवठा होर्इल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असतांनाही येथे मात्र वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून शेतीला केवळ चार तासच वीज पुरवठा होत आहे. उन्हाळा सुरु झाला असून पिकांना पाणी देणे गरजेचे असतांनाही केवळ वीज उपलब्ध होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
कुंदन पाटील, हेमंत पाटील, किरण पाटील, देवानंद पाटील, धनराज पाटील, सोनू पाटील, भारत पाटील, दीपक पाटील, नारायण इंगळे, वासुदेव इंगळे, एम.जी. पाटील, नवल इंगळे, वासुदेव इंगळे , प्रमोद पाटील या शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतांनाही वरिष्ठ पातळीवरुन याबाबत कुठलीही उपाययोजन होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. वारंवार तक्रारी करुनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

