मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धानोऱ्यात घेतली झाडाझडती!
शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा : मीनल करनवाल यांच्या सूचना
धानोरा, ता. चोपडा;- येथे आज बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांनी अचानक भेट देत ग्रामपंचायत कार्यालय, जि.प मराठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांची पाहणी करत मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक आणि वैद्यकीय अधिकारी यांना राज्य शासनाच्या योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी असून त्याचा वापर योग्यरीतीने कसा होईल याबाबत सूचना केल्या.
धानोरा येथे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाररी मीनल करनवाल, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, विस्तार अधिकारी जे. पी. पाटील, रामचंद्र सैंदाणे, ललित पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देत ग्रामविकास अधिकारी कांतीलाल कोळी यांच्याकडून राज्य शासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर ज्या विविध योजना राबविण्यात येत आहेत त्या संदर्भात माहिती घेतली. श्रीमती करनवाल यांनी अचानक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला भेट देत येथील विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारात विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या त्याचप्रमाणे मुख्याध्यापक अंबादास पाटील यांना देखील विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी वर्ग खोल्या तसेच शालेय पोषण आहाराची देखील पाहणी केली. विद्यार्थ्यांना आज काय मेनू दिला जात आहे तसेच विद्यार्थ्यांना केळी देण्यात यावी अशी सूचना केली.
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याकारणामुळे या ठिकाणी भेट देऊन त्यांनी रुग्णांना वेळेवर व्यवस्थित उपचार मिळत आहेत की नाही याची पाहणी केली. गरोदर माता यांना वेळेवर वैद्यकीय पद्धतीने उपचार मिळत आहेत की नाही या बाबत उपस्थित रुग्णांना विचापूस केली. आरोग्य केंद्रात असलेल्या विविध सोयी सुविधा तसेच या ठिकाणी हजेरी मस्टर चेक केले आणि आज किती कर्मचारी हजर आहेत याची देखील माहिती जाणून घेतली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी कानउघाडणी!
आरोग्य केंद्राच्या पाहणी दरम्यान धक्कादायक प्रकार त्यांना दिसून आला. नवीन जन्मलेल्या बाळाला विचित्र अवस्थेत गुंडाळून ठेवलेले असल्याचे दिसताच त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
यावेळी सरपंच रज्जाक तडवी, उपसरपंच विजय चौधरी, रवींद्र शिरसाट, डॉ. उमेश कवडीवाले, डॉ. सोनाली देशमुख, आरोग्य सेविका भिकुबाई बोराडे, भारती पाटील, रोजगार सेवक भगवान कोळी, रुग्णवाहिका चालक प्रवीण ठाकूर, गोकुळ कोळी, प्रशांत चौधरी उपस्थित होते



