लोकशाही न्यूज नेटवर्क
धनंजय पुष्पलता करवीर ठाकरे यांची लोकधोरण संशोधन या अभ्यासक्रमासाठी जगातील नावाजलेल्या अशा लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात संपूर्ण देशातून निवड झाली आहे. 30 देशांमधून केवळ 40 विद्यार्थी यासाठी निवडल्या जातात. जवळपास वर्षभर चालणारी ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत काठीण्य पातळीची असते. जगभरातील विविध सरकारी यंत्रणा, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संघटना जसे संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक, नीती आयोग अशा ठिकाणी सल्लागार म्हणून या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर संधी मिळते.
याशिवाय धनंजयची निवड ही ऑक्सफर्ड, बर्मिंगहम, ससेक्स व सोयास या इतर नावाजलेल्या विद्यापीठामध्ये सुद्धा झाली आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनमिक्स मध्ये शिक्षण घेतलेले असल्यामुळे आपनसुद्धा तेथूनच शिक्षण घेणार असल्याचे धनंजयने सांगितले आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा जागतिक स्तरावर सिद्ध होऊ शकतात फक्त त्यासाठी इच्छाशक्ती आणि मेहनत घ्यावी लागते. अशाच प्रकारची जिद्द असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मला मदत करायची आहे”. यापूर्वी धनंजय ठाकरे मंत्रालयात जनसंपर्क अधिकारी, टाटा ट्रस्ट मध्ये प्रकल्प व्यवस्थापक आणि बारामती ऍग्रो मध्ये व्यवस्थापक या विविध पदांवर कार्यरत होते. याशिवाय त्यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित असा राष्ट्रीय युवा पुरस्कार 2008-09 वयाच्या केवळ 18 व्या वर्षी मिळालेला आहे. धनंजय श्री. शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असुन याच विद्यालयाचे माजी शिक्षक के. आर. ठाकरे यांचे सुपुत्र आहेत.