संतोष देशमुख यांचा खून करायला धनंजय मुंडे जबाबदार

‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा : चौकशीची मागणी

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत ईडी चौकशीची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावरून धनंजय मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘धनंजय मुंडे यांचीही ईडी चौकशी करा. मुंडे पुरावे नष्ट करत असतील तर अजित पवार आणि फडणवीसही जबाबदार आहेत. अजित पवारांना काही गोष्टी माहिती आहेत तरी ते धनंजय मुंडेंना पाठिशी घालत आहेत.’, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करताना सांगितले की, ‘धनंजय मुंडे पुरावे नष्ट करत आहेत. आरोपी लपवण्यासाठी तेच जबाबदार आहे. संतोष देशमुख यांचा खून करायला धनंजय मुंडे जबाबदार आहे. अजितदादांना काही गोष्टी माहित असतील. तुम्ही पापी लोकांना पांघरूण घालण्याचे काम करू नये. धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी झाली पाहिजे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस त्याला जबाबदार असते.’

‘धनंजय मुंडे यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंसोबत प्रत्येक जागी असतो. आणखी काय पुरावे पाहिजे. धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला तू काहीही कर म्हणून परवानगी दिली. धनंजय मुंडेंची सगळी चौकशी झाली पाहिजे कारण ते हत्येमध्ये सहभागी असणारच आहेत. बोगस पिक विम्यातही धनंजय मुंडेंचा सहभाग आहे.’, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.