लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून परीते गावातील दोन भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात काल परिते गावातील काही नागरिक दर्शनासाठी गेले होते. यावेळी पुजारी आणि या नागरिकांमधून तुंबळ हाणावरी झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
ज्योतिबा मंदिरात 15 ते 20 पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित पुजारी भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसत आहे. इतकंच नाही, तर दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एका बाजूला काही नागरिक मद्यप्राशन करून हुलडबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच देव कार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे पुजाऱ्यांनी अरेरावी करत भाविकांना मारहाण केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या प्रकरणात परिते गावातील भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत ते देवस्थानला या संदर्भात जाब देखील विचारणार आहेत. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकासंदर्भात कालच्या घटनेचा निषेध नोंदवत आज संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरील दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

