गुलाबराव देवकरांचा अद्याप राजीनामा नाहीच ; कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर होणार निर्णय ?

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा  कार्यकाळ माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचा पूर्ण झाला असून ते आज सोमवारी राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात होते . मात्र त्यांनी आज दुपारपर्यंत राजीनामा दिला नसला तरी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात दुपारी ४ वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याने आगामी जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
डॉ.सतीश पाटील,अ‍ॅड. रवींद्र पाटील आणि संजय पवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. तिघांपैकी कोणाला चेअरमनपदाची संधी मिळणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक 11 जागा निवडून आलेल्या आहेत.तर त्या खालोखाल 6 जागा शिवसेना आणि काँग्रेसच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. तर भाजपची एक जागा निवडून आलेली आहे.

जिल्हा बँक अध्यक्षपद निवडीचे अधिकार माजीमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना दिले असल्याचे पक्षाचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.