राज्यातील प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई वृत्तसंस्था
राज्यातील प्रार्थना स्थळांवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत भोंग्यांमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी लक्षवेधी मांडली, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्यापूर्वी पोलिसांकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच पोलीस निरीक्षकावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जर पोलीस निरीक्षकाने दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
डेसिबल मर्यादा व वेळेचे नियम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार,रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजेत.सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ५५ डेसिबल (दिवस) आणि ४५ डेसिबल (रात्र) ही आवाजाची कमाल मर्यादा असेल.जर कोणत्याही भोंग्याचा आवाज या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) कारवाई करेल.
परवानगी न मिळाल्यास भोंगे होणार जप्त
यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही. मिळालेली परवानगीही निश्चित कालावधीसाठी असेल. त्या कालावधीनंतर परत परवानगी घ्यावी लागेल. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित भोंगे जप्त करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षकांची जबाबदारी ठरवली
प्रत्येक पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या विभागातील प्रार्थना स्थळांवर जाऊन भोंग्यांची परवानगी तपासली पाहिजे.प्रत्येक पोलीस ठाण्याला डेसिबल मोजण्यासाठी मीटर देण्यात आले आहे.डेसिबल मर्यादा ओलांडल्यास प्रथम MPCB ला कळवले जाईल व त्यानंतर कठोर कारवाई केली जाईल.मंजूर मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या ठिकाणी पुन्हा परवानगी मिळणार नाही.
भोंगे नियमांबाबत केंद्र सरकारला विनंती
सध्याचे कायदे अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, जेणेकरून अत्यंत कठोरपणे या नियमांची अंमलबजावणी करता येईल. यापुढे भोंग्यांबाबत नियमांचे पालन करणे पोलीस निरीक्षकांसाठी बंधनकारक असेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.