‘आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, महाआघाडीने..’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. नाट्यमय घडोमोडींसह ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेसाठी भाजपाच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा राज्य सभेवर जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील- फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा राज्य सभेवर जात आहेत. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. भाजपाचे अनिल बोंडे हे कृषिमंत्री राहिले आहेत. ते कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ असून पुन्हा एकदा राज्यातून निवडून जात आहेत. याशिवाय कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे आमचे तिसरे उमेदवार असून आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजपाल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला घोडे बाजार करायचा नाही कारण..  

यावेळी बोलताना फडणवीस यांनी खासदार राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. कारण आमचे तीन उमेदवार रिंगणात असून ते निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातील महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा म्हणजे घोडेबाजारचा प्रश्न येणार नाही. तरीही त्यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवला तरी आमचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. आमचे तीनही उमेदवार सक्रिय राजकारणात असल्याने काही लोक सद्सदविवेक बुद्धीने आमच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक फॉर्म भरला असल्याचेही ते म्हणाले.

आठ वर्षांमुळे नवभारताचं चित्र समोर आलं आहे

गेल्या आठ वर्षात केंद्रातील मोदी सरकारने भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मध्यमवर्गीयांना पंतप्रधानांचे काम पसंत असल्याने ते आता जगाचे एक प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त नेते झाले आहेत. या आठ वर्षांमुळे नवभारताचं चित्र समोर आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here