देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदासाठी पात्र !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत : दुसरा, तिसरा कुणीही नको

0

दीपक कुळकर्णी, लोकशाही विशेष 

महायुती सरकारमध्ये भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून असावेत, दुसरा, तिसरा कुठलाही चेहरा नको अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत संघाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाव महायुतीला मोठे यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीच त्याग केला असून आता त्यांना ते पद मिळणे स्वाभाविकच नव्हे तर ते सर्वमान्य आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. निकालाला आठवडा उलटला तरीही अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. सत्ताधाऱ्यांना अद्याप मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत यासाठी संघ आग्रही आहे. पण भाजपने फडणवीस यांचे नाव अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही. महायुतीच्या नेत्रदीपक विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. भाजपचे नेतृत्त्व त्यांनीच यशस्वीपणे केले. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदास पात्र आहेत, असे संघाला मनोमन वाटत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. यातील तावडे, पाटील, मोहोळ मराठा समाजातून येतात. तर बावनकुळे ओबीसी समाजातून येतात. महायुतीच्या विजयात दोन्ही समाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच या दोन्ही समाजातील नेत्यांच्या नावांचा विचार भाजप नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात येत असला तरी भाजपाच्या जवळपास सर्वच आमदारांना फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे आहेत.

भाजप महायुती विजयी झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा विचार करुनच संघ परिवाराने विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. संघाचे हजारो स्वयंसेवक त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार केला. संघ प्रचंड सक्रिय झाल्यामुळेच लोकसभेला 48 पैकी 17 जागा जिंकणारी महायुती विधानसभेला 288 पैकी तब्बल 234 जागांपर्यंत मजल मारली आहे. लोकसभेला भाजपच्या जागा 33 वरुन 9 वर आल्या होत्या. विधानसभेला त्या 105 वरुन 132 वर गेल्या आहेत. फडणवीस यांनीच भाजपचे नेतृत्त्व केल्याने ते मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पात्र ठरतात, असा संघाचा दावा आहे. फडणवीसांची निवड न झाल्यास त्याचा फटका पक्षाला महापालिका निवडणुकांमध्ये, विशेषत: मुंबईत बसेल, असे संघाला वाटते.

 

असा आहे युक्तिवाद

नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदे मिळणार आहे. त्या पदांवर अजित पवार, एकनाथ शिंदे यांची वर्णी लागेल. हे दोघे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत भाजपनेही मराठा नेताच मुख्यमंत्रिपदी देण्याचे कारण नाही, असा संघाचा युक्तिवाद आहे. फडणवीसांच्या नेतृत्त्वात यश मिळाले. मग त्याचे श्रेय त्यांना देऊन मुख्यमंत्रिपदी वर्णी लावणे गरजेचे असल्याचेही संघाला वाटत आहे.

 

आमदारांच्या मनातही फडणवीस

पूर्वीचे पाच वर्षे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता व उपमुख्यमंत्री असा फडणवीसांचा प्रवास झाला आहे. या पदांवर असतांना फडणवीसांनी भाजपाच्याच नव्हे तर मित्रपक्षांच्या आमदारांनाही समान वागणूक दिली असून प्रत्येकाचे काम ‘तातडी’ने मार्गी लावण्याचे कौशल्य फडणवीसांमध्ये असल्याने सर्वच आमदारांच्या मनात फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.