लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. पराभवाचा निर्णय येताच गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. तथापि गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला स्थानिक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्यामुळे गुलाबराव देवकरांचा प्रवेश गेले पाच महिने रखडला होता. देवकरांच्या प्रवेशावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे देवकरांच्या निश्चित झालेल्या प्रवेश स्थगित करण्यात आला होता. विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला विरोध होता, असे कळते.
तथापि गेल्या पाच महिन्याच्या खलबता नंतर गुलाबराव देवकर तसेच जिल्ह्यातील इतर शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचा मोठा प्रवेश सोहळा येत्या ३ मे रोजी मुंबई येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि संपर्कप्रमुख अनिल भाईदास पाटील यांनी काल पत्रकारांना दिली. त्यामुळे आता गुलाबराव देवकरांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. गुलाबराव देवकरांबरोबरच माजी मंत्री पारोळ्याचे सतीश पाटील, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, चोपडा सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील, तिलोत्तमा पाटील आदींसह अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. त्या पत्रकार परिषदेला स्वतः गुलाबराव देवकर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार हेही उपस्थित होते.
पक्ष संघटना वाढविण्यासाठी अजित पवार गटाचा हा निर्णय असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हा पक्षप्रवेश दिला जात आहे, एवढे मात्र निश्चित. गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, डॉक्टर सतीश पाटील हे शरद पवार काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे सत्ताधारी पक्षात ही मंडळी प्रवेश करून आपले अस्तित्व टिकवू पाहत आहे, अशी टीका मात्र होते आहे. आणि ही टीका रास्तच म्हणावी लागेल.
गुलाबराव देवकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे महायुतीला समर्थन होय. परंतु जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांचे राजकारणात विळा भोपळ्याचे नाते आहे. त्या दोघांमधील राजकीय वैमानस्य सर्वश्रुत आहे. गुलाबराव देवकरांनी स्वतःच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी जोरदार टीका आणि हल्लाबोल गुलाबरा पाटलांनी केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये जरी ही मंडळी गेली तरी त्यांच्यात कितपत सौख्य नांदेल हे सांगणे कठीण आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरू असलेले शीतयुद्ध पाहता सर्वकाही अल्बेल राहील, असे वाटत नाही.
शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे जिल्हा पालकमंत्री आहेत. त्यामुळे गुलाबराव देवकरांबरोबर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यांना कितपत सहकार्य केले जाईल हे काळच ठरवेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा त्यांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा राहील, हे स्पष्टपणे दिसून येणार आहे. त्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सख्ख्या पाहता जळगाव जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचा प्रयत्न करतील, एवढे मात्र निश्चित. त्यात शिवसेनेला बाजूला फेकले जाईल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न होईल, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची गोची होण्याची शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री अजित पवार गटाचे संपर्कप्रमुख अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय चित्रच वेगळे राहील एवढे मात्र निश्चित…!