आरोग्य सेवा बळकट करण्याची मागणी

आ. करण देवतळे यांचा विधानसभेत मुद्दा

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य विभागाच्या चर्चेदरम्यान वरोरा भद्रावती मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांनी मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा प्रश्न ठळकपणे उपस्थित केला. औद्योगिक परिसर, कोळसा खाणी व महामार्गांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने ट्रॉमा केअर सेवा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

प्रसंगी देवतळे यांनी सांगितले की, ट्रॉमा केअर युनिटची इमारत उभारण्यात आली असली तरी पूर्णवेळ डॉक्टर, नर्स व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना चंद्रपूर येथे हलवावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे व ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच शहर भागात स्वतंत्र अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर नसल्याने नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही इतर ठिकाणी जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच बोर्डा, जामगाव खुर्द, खेमजेई व आनंदवन परिसरात नवीन उपकेंद्रे सुरू करणे, औषधसाठा वाढविणे व ग्रामीण भागातील दवाखान्यांची सुविधा सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान कंत्राटी आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणे, त्यांचे समायोजन व किमान वेतनाची अंमलबजावणी करणे, तसेच रिक्त पदे भरणे यावर त्यांनी भर दिला. एमआरआय व सीटी स्कॅन यंत्रणा सरकारी रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली, जेणेकरून नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आर्थिक भार सहन करावा लागू नये.

याशिवाय कुष्ठरोग व हत्तीरोगग्रस्त नागरिकांसाठी आर्थिक मदत व पुनर्वसन योजना बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय आरोग्य सेवेबाबत कोणतीही तडजोड मान्य नसून शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी सभागृहात व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.