चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत वितरित होणाऱ्या धान्याच्या कथित काळाबाजाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना पक्षाचे पूर्व विदर्भ प्रभारी (महाराष्ट्र) ॲड. वामशीकृष्ण हनुमंतु अरिकिल्ला यांनी प्रत्यक्ष भेटून सादर केले.
निवेदनात काही भागांत रेशनधारकांकडून धान्याची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारींचा उल्लेख करण्यात आला असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविणे, गरजू लाभार्थ्यांचे हक्काचे धान्य सुरक्षित ठेवणे आणि काळाबाजार करणाऱ्या साखळीवर प्रभावी कारवाई करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विषयाचा योग्य स्तरावर विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अॅड. वामशीकृष्ण अरिकिल्ला यांनी दिली.

