सर्वाधिक शिव्या देण्यात दिल्ली आघाडीवर!

महाराष्ट्र सातव्यास्थानी : सर्वेक्षणातून आली आकडेवारी

0

मुंबर्इ : शिव्या हा कोणत्याही भाषेचा अविभाज्य भाग असतो असे भाषाविषयक तज्ज्ञ म्हणतात. अर्थात शिव्या देणे हे वाईटच आहे. मात्र शिव्याची उत्पत्तीपासून ते त्या कशा बदलत गेल्या यासंदर्भातील अभ्यास अनेक भाषा विषय तज्ज्ञांनी यापूर्वी केले आहेत. मन मोकळे करण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी आमच्या तोंडून अपशब्द निघतो असे शिव्या देणारे सहज मान्य करतात. मात्र भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यासंदर्भातील एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. विशेष म्हणजे शिव्या देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकवर तर देशाची राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.
एका सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की दिल्लीतील लोक सर्वात जास्त अपशब्द वापरतात. आया-बहिणींवरुन आणि मुलींना लक्ष्य करणारे अपशब्द राजधानीत सर्वात सामान्यपणे वापरल्या जातात. सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील 80 टक्के लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अपशब्द वापरतात.

असे झाले सर्वेक्षण
सेल्फी विथ डॉटर फाउंडेशनचे संस्थापक आणि महर्षि दयानंद विद्यापीठातील प्रॅक्टिसचे प्राध्यापक डॉ. सुनील जगलान यांनी ‘गाली बंद घर अभियान’ सुरू केले आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये दीर्घकालीन सर्वेक्षण करण्यात आले. 11 वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 70 हजार लोकांकडून प्रतिसाद नोंदवण्यात आला. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या समाजिक स्तरांतील प्रतिनिधी होते. तरुण, पालक, शिक्षक, डॉक्टर, ऑटो चालक, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलिस, वकील, व्यापारी, स्वच्छता कर्मचारी, प्राध्यापक आणि पंचायत सदस्य यांचा समावेश होता.

सर्वाधिक शिव्या देणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील 78 टक्के लोकांनी आपण अपशब्द वापरल्याचे मान्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार प्रत्येकी 74 टक्के लोकांनी आपण अपशब्द वापरतो, राजस्थानमधील 68 टक्के आणि हरियाणा 62 टक्के लोकांनी आपण अपशब्द वापरत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र सातव्यास्थानी!
महाराष्ट्रातील 58 टक्के लोकांनी आपण अपशब्द वापरतो असे म्हटले आहे. या यादीत महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल गुजरातमधील 55 टक्के लोकांनी अपशब्द वापरतो असे मान्य केले आहे. मध्य प्रदेशमधील 48 टक्के आणि उत्तराखंड 45 टक्के लोकांनी आपण अपशब्द वापरत असल्याचे मान्य केले आहे. सर्वाधिक शिव्या देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये जम्मू आणि काश्मीर सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. येथील फक्त 15 टक्के लोकांनी अपशब्द वापरल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.