नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज महानिकाल लागत असून दिल्लीत कोणाचा सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. त्यातच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. तसेच आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांचा 600 मतांनी विजय झाला आहे. तसेच राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. जे जिंकले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. नेमकं काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करु, असं मनीष सिसोदिया म्हणाले.