दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. याबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप आम आदमी पार्टी आणि सिसोदिया यांनी म्हटलं आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचं संपूर्ण खापर भाजपवर फोडलं आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.

यावेळी भाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. त्यावेळी आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. या प्रकरणी आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असून आता या परिसरात शांतता असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.

दरम्यान, केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला नंतर आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. हे पहिल्यांदाच होत नाही. जेव्हा जेव्हा भाजप निरुत्तर होते, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून असे हल्ले होतात. हा लोकशाहीला धोका आहे. दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राय यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.