लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल प्रस्थापितांना धक्का देणारा ठरला. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव नगरपालिका या होमपीचेवर शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार वीणा भावे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लिलाबाई सुरेश चौधरी यांनी 2338 मतांनी दणदणीत पराभव केला. लिलाबाई चौधरी यांच्या विजयाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुका घोषित झाल्यापासून महायुती करावी की करू नये? या मानसिकतेत ते होते. पाचोरा भडगावमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळाची घोषणा केली. त्याला गुलाबरावांनी पाठिंबा दिला. पण स्वतःच्या मतदारसंघात स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास त्यांना नव्हता. म्हणून धरणगावात महायुती इतर नशिराबाद नगरपंचायतीत भाजप-शिवसेना युती त्यांना करावी लागली.
नशिराबादमध्येराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्रपणे लढला. धरणगावला शिवसेनेचा नगराध्यक्ष तर नशिराबादला भाजपचा नगराध्यक्ष अशी युती झाली. धरणगाव नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह निर्वाचित बहुमत प्राप्त करण्याचा आत्मविश्वास गुलाबरावांना होता. नगराध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी होईल असे त्यांना वाटले होते. परंतु लिलाबाई चौधरींनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार वीणा भावे यांचा 2338 मतांनी दणदणीत पराभव केल्याने हा पराभव गुलाबरावांना जिव्हारी लागला, असेच म्हणावे लागेल. एकूण 23 जागा असलेल्या धरणगाव नगरपालिकेत 15 जागांवर नगरसेवकांच्या जिंकून गुलाबरावांच्या शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठ नगरसेवक निवडून आले हेही काही कमी नाही. त्यातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव म्हणजे ‘गड आला पण सिंह गेला’ असेच म्हणावे लागेल. मंत्री गुलाबराव पाटलांची शेरोशायरी तसेच अहिराणी बोली भाषेतील वक्तृत्वामुळे ख्याती आहे. परंतु सामान्य कुटुंबातील एका अशिक्षित महिला लिलाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेत जे उत्स्फूर्त भाषण दिले, त्याने धरणगावकरांची मने जिंकली. मी सुशिक्षित नाही अनुभवी आणि संस्कारी आहे. गरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच माझे शिक्षण आहे. त्यापदावर असलेल्या मंत्र्याला अशी टीका करणे शोभणारे नाही, अशा लिलाबाईंच्या भाषणातील वक्तव्यांना धरणगावकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली आणि लिलाबाई चौधरींच्या या बिनधास्त मनातून केलेल्या भाषणाने धरणगावकरांची मने जिंकली पालकमंत्री गुलाबराव पाटलांना हा फार मोठा धक्का म्हणावा लागेल.
धरणगाव नगरपालिकेत नगरसेवकांचे शिवसेनेला बहुमत असल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील निधीच्या संदर्भात लिलाबाई चौधरींची कोंडी करतील असे गुलाबराव समर्थकांमध्ये बोलले जात आहे. परंतु तसे जर गुलाबरावांनी करण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार होईल, यात तीळ मात्र शंका नाही. कारण नगराध्यक्षपदासाठी विराजमान झालेला लिलाबाई चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत जे म्हटले आहे, ते गुलाबराव पाटलांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. शासनाच्या नियमानुसार जो निधी मिळतो तो मिळणारच आहे. त्यासाठी मंत्र्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही. परंतु काही विकास कामांसाठी निधी कमी पडत असेल तर तो वाढवून घेण्यासाठी मला मंत्र्यांकडे जावे लागणार असेल तर त्यांच्याकडे जाण्यासाठी मला काहीही लाज वाटणार नाही. लिलाबाई चौधरींचे हे उद्गार अनेक सुशिक्षित अनुभवी राजकारण्यांना लाजवणारे आहे, यात शंका नाही. त्यातच मला कुठल्याही कामात हक्क नको आहे. मी निस्वार्थपणे धरणगावकरांची सेवा करणार आहे. धरणगावातील नगरपालिकांच्या शाळांची झालेली दुरावस्था आधी सुधारणार आहे. गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. ते मी करणार आहे. या लिलाबाई चौधरी यांच्या निर्धाराने गुलाबराव पाटलांना फार मोठा धक्का बसणार आहे.
लिलाबाई चौधरींच्या रूपाने मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदार संघातील राजकारणाची समीकरणे बदलण्यास कारण ठरतील. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा चिंतेचा विषय म्हटला पाहिजे. कारण परिवार वादाचा गुलाबरावांना फटका बसू शकतो. मुलगा प्रताप पाटील हे जिल्हा परिषदमध्ये सदस्य होते. यापुढेही राहतील. त्यामुळे त्यांच्या विरोधात टीकाटिपणी होत आहे. धरणगाव नगरपालिकेतील पराभव ही त्यांची नांदीच म्हणता येईल. त्यामुळे गुलाबराव पाटलांना सावधराहण्याची गरज आहे..!

