सर्वसमावेशक विकासासाठी ‘दीपस्तंभ मनोबल प्रकल्प’ आदर्श !

कुरुश ईराणी यांचे प्रतिपादन : प्रज्ञाचक्षु प्रथमेश सिन्हा याच्या हस्ते ध्वजारोहण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक विकसित होत नाही, तोपर्यंत खरा विकास म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थाने विकसित भारत तेव्हाच साकार होईल, जेव्हा दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होईल. दीपस्तंभ मनोबल प्रकल्प हे या स्वप्नाची पूर्तता करण्याचे एक आदर्श उदाहरण आहे, जिथे सर्वसमावेशक विकासाला दिशा दिली जाते. खऱ्या अर्थाने विकसित भारत म्हणजे प्रत्येकाला समान संधी, न्याय, आणि सन्मान मिळालेला समाज, असे प्रतिपादन बजाज फिनसर्वच्या सीएसआर विभागाचे प्रमुख कुरुश ईराणी यांनी केले.

दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलमध्ये ध्वजारोहण राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रज्ञाचक्षु विद्यार्थी प्रथमेश सिन्हा याच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी दिव्यांग मुलांनी पथसंचलन करत मान्यवरांना व्यासपीठाकडे आणले.

यावेळी कुरुश ईराणी, वीरेंद्रकुमार कावडीया, गोविंद कोलते, सतीश मंडोरा, नंदू अडवाणी, कृष्णन सुब्रमणियन, दीपस्तंभ फाऊंडेशनच्या संचालिका सविता भोळे उपस्थित होते. या प्रसंगी वीरेंद्रकुमार कावडीया आणि गोविंद कोलते यांना कृतज्ञता सन्मान देण्यात आला.

प्रास्ताविकात संवाद साधतांना यजुर्वेंद्र महाजन म्हणाले, आपण सर्वांनी मिळून भारत देश बनला आहे. टीका करण्यापेक्षा मी काय करू शकतो? माझी काय जबाबदारी आहे? याचे स्मरण आजच्या दिवशी आपण केले पाहिजे. आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पूर्ण केले तर आपला देश महान होईल.  दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात स्वाभिमानाने जगण्याची कला शिकवली जाते. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे या उक्तीप्रमाणे, आपण जे साध्य करू इच्छितो असे सांगितले.

या प्रसंगी प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनी समीक्षा माकोडे, नाझनीन शेख यांनी देशभक्तीपर गाण्याचे सादरीकरण केले. प्रज्ञाचक्षू ममता नाकतोडे, मंगल, आचल यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. प्रज्ञाचक्षू नीलिमा वावरेने हिंदी भाषेतून प्रजासत्ताक दिनाचे महत्व प्रभावीपणे उलगडून सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनी साक्षी संपते, रुद्रेश पाटील यांनी तर आभार  मंगल ढोकरटने मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.