दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी होणार उपमहापौर
शुक्रवारी बिनविरोध निवड शक्य : निष्ठावानांना मिळाली संधी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महानगरपालिकेच्या सतराव्या महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांची पक्षाकडून निवड करण्यात आली आहे. उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाने देखील निष्ठावंताला संधी देत चौथ्यांदा नगरसेवक झालेले मनोज सुरेश चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब्ब केले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 46 जागा जिंकून आपले बहुमत देखील सिद्ध केले आहे. मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट देखील 23 पैकी 22 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. महानगरपालिकेमध्ये महायुतीने मिळून 75 पैकी 70 जागावर विजय मिळविला आहे. संख्याबळानुसार महापौरपद भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे आहे.

महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला या प्रवर्गासाठी निघाले असून ओबीसी महिला प्रवर्गमधून निवडून आलेल्या 5 महिलांपैकी भाजपने आता दीपमाला मनोज काळे या तिसऱ्यांदा निवडून आलेल्या व बिनविरोध झालेल्या महिला नगरसेविकेला संधी देण्यात आली आहे. दीपमाला काळे यांना साधारणत: सव्वा किंवा अडीच वर्ष संधी मिळू शकते. शिवसेनेकडून चौथ्यांदा नगरसेवक झालेले मनोज सुरेश चौधरी हे प्रबळ दावेदार होते. त्यामुळे अपेक्षाप्रमाणे उपमहापौर पदाची धुरा आता त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे.
