महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान
कार्यकर्त्यांनी केला जल्लोष : विकासाला प्राधान्य देणार
जळगाव
महानगरपालिकेच्या सतराव्या महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी आज विशेष सभेनंतर विराजमान झाले. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या नावांची घोषणा केली.

महापौर, उपमहापौर निवड होतांच कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात मोठा जल्लोष केला. ढोल-ताश्यांचा गजर व घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी दोन अर्ज दाखल केले त्यापैकी एक अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी इरत कुठल्याही पक्षाकडून अर्ज सादर न झाल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाने निष्ठावंताला संधी देत चौथ्यांदा नगरसेवक झालेले मनोज सुरेश चौधरी यांच्या नावाला पसंती दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 46 जागा जिंकून आपले बहुमत सिद्ध केले तर मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट देखील 23 पैकी 22 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर रहिला. महानगरपालिकेमध्ये महायुतीने मिळून 75 पैकी 70 जागांवर विजय मिळविला आहे. महापौरपदाचे आरक्षण ओबीसी महिला या प्रवर्गासाठी असून ओबीसी महिला प्रवर्गमधून निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांना संधी देण्यात आली आहे.
विकासाला प्राधान्य देणार!
दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर दीपमाला काळे यांनी शहराच्या सर्वांगिण विकासाल प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. महायुतीने आपल्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे. या संधीचे विकासाच्या माध्यमातून सोने केले जार्इल. जळगावकरांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर आपला भर असल्याचे दीपमाला काळे व मनोज चौधरी यांनी सांगितले.