लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता २४ वर पोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून, तपासासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील ससाणे नगर येथील विकास किसन केदारी (वय ६०) आणि निलेश घोलप (वय ४५) यांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी दारू पिल्यानंतर दोघांनाही चक्कर येणे, तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांबाबत पोलिसांकडे यापूर्वी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान पुणे शहरातील मृतांची संख्या ९ वर पोहोचली असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण २४ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, काही रुग्णांवर अद्याप विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस यांनी प्राथमिक तपास केला असला तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता सीआयडीकडून व्यापक चौकशी केली जाणार आहे.
दुसरीकडे, विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी अवैध हातभट्टी आणि गावठी दारू विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. पांढरेमळा परिसरात छापेमारी करून चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १८० सीलबंद गावठी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील अनेक अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


