लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विखारी टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्या टीकेला शरद पवार यांनी काल उत्तर दिलं. शरद पवार यांनी इतिहासाची पान पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या. त्यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्ला केला. अमित शाहंचा तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला. “हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील” असं शरद पवार म्हणाले.
त्याला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं. “दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत” असं विनोद तावडे म्हणाले.
“दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का?. श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे” असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.