“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष !

0

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष !

जळगाव जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात साजरी

भाविकांची अलोट गर्दी; पूजा-अभिषेक, आरती व महाप्रसाद

जळगाव (प्रतिनिधी) :“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त…, दत्त महाराज की जय…” अशा जयघोषांनी गुरुवारी जळगाव शहरसह जिल्हा दुमदुमून गेला. दत्त जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या.

जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील दत्त मंदिर परिसरात मोठी भाविकांची गर्दी उसळली होती. पहाटे अभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, आरती, कीर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने परिसर भक्तिमय झाला.

पिंप्राळा दत्त मंदिरातही भाविकांचा ओसंडून प्रतिसाद

पिंप्राळा येथील दत्त मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी सुरू केली होती. दिवसभर पूजा, अभिषेक, आरती आदी उपासनेने वातावरण भारले होते. सध्या येथे सुरू असलेल्या ‘श्रीदत्त जन्म महोत्सवा’त आज दत्त जयंतीनिमित्त विशेष पूजा पार पडली.

प्रतापनगरात आ. राजूमामा भोळे यांचे दर्शन

प्रतापनगरातील स्वामी सेवा केंद्रात आमदार राजूमामा भोळे यांनी हजेरी लावत दत्ताच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यांच्या भेटीदरम्यान भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

जिल्हाभरात मोठा उत्साह चोरवड यात्रेला जनसागर

फक्त जळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात साजरी झाली. पारोळा तालुक्यातील चोरवड येथे पारंपरिक दत्त यात्रेला हजारो भाविकांची मांदियाळी जमली. नवस फेडणारे भाविक आणि महाप्रसादाचे आयोजन यामुळे यात्रास्थळ भक्तीभावाने गजबजून गेले होते.

चोरवड येथे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रोत्सवाला सुरूवात

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील
श्री दत्तप्रभूंचे जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या यात्रेला सुरुवात झाली आहे.मार्गशीर्ष महिन्यात ही यात्रा भरत असते या यात्रोत्सवाला ४०० वर्षाची समृद्ध परंपरा कायम आहे.
चोरवड हे पारोळा शहरापासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर आहे.भाविकांना येथे जाण्यासाठी पारोळा बस स्थानकातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
चोरवड गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराज यांचे पुरातन मंदिर एक लहान व एक मोठे मंदिर आहे.दोन्ही मंदिरात इ.स.वी.सन १६०२ मध्ये श्री दत्ताची मूर्ती स्थापन केल्याचा इतिहास आहे.

महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे हे खान्देशात एकमेव स्थान असून दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी राज्यातून हजारो भक्त हे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.या यात्रेसाठी पारोळा बस विभागाकडून ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी पारोळा आगाराने हे नियोजन केले आहे.त्यामुळे पारोळा, अमळनेर,चोपडा,धुळे, शिरपूर,बसेस मिळणे सोयीचे होणार आहे.दरम्यान या यात्रेत आठ ते दहा दिवस पाळणे,करमणुकीसाठी विविध स्टॉल,खाद्य पदार्थाच्या गाडया लावण्यात आल्या आहेत.या दुकानांमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप असते.यात्रेच्या नियोजनासाठी सरपंच राकेश पाटील व सदस्य तसेच पोलिस पाटील,ग्रामसेवक, तलाठी यांचे विशेष सहकार्य लाभत असते.

मंदिराचा इतिहास

येथील रावजी बुवा यांच्या झोळीत आलेल्या फुलांचे रूपांतर दत्ताच्या मूर्तीत झाल्याची आख्यायिका सर्वभूत आहे.यात मोठे दत्त मंदिर १५० वर्ष छत नसतांना उभे होते.त्यानंतर एकाच रात्रीत सदर छत बांधले गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.तर लहान मंदिरात शेजारी औदुंबराचे झाड असून यात्रेदरम्यान भूत,पिशाच यांची डोक्यावरील उरे औदुंबरास बांधली जातात. असा मंदिराचा इतिहास आहे. जिथे विज्ञान थांबते तेथे दुवा सुरू होते,असा विश्वास पंचक्रोशीसह राज्यातील भाविक भक्तांच्या आजही टिकून असल्याने आजही हजारो भाविकांची येथे मांदियाळी दिसुन येते.

मुक्ताईनगर : दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भक्तिमय उत्सव; स्वामी समर्थ सप्ताहाची भव्य सांगता

मुक्ताईनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जुने गाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञा व आशीर्वादाने दत्त जयंती निमित्त २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान अखंड नामजप, यज्ञ–याग, प्रहारे व सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. २८ नोव्हेंबर रोजी सप्ताहाला सुरुवात झाली असून आज सप्ताहाची भक्तिमय सांगता करण्यात आली.

सप्ताहकाळात दररोज सकाळी भूपाळी आरतीनंतर सामूहिक गुरुचरित्र पारायण, साडेदहा वाजता नैवेद्य आरती, तसेच गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, गीताई याग, श्री चंडी याग, मल्हारी व रुद्र याग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. आज दुपारी १२.३९ वाजता नित्य स्वाहाकार, बळी पूर्णाहुती आणि दत्त जन्मोत्सव महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले. उद्या सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान मोठ्या संख्येने भक्तांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला.

समाप्तीच्या दिवशी सेवेकऱ्यांच्या घरून आणलेल्या जेवणाच्या डब्यांचा नैवेद्य दाखवून मांदियाळी करण्याची सुंदर परंपरा देखील यंदा उत्साहात पार पडली. गुरुचरित्र वाचनासाठी एकूण ११६ महिला-पुरुष सेवेकरी बसले होते. प्रहर सेवेत सकाळी ७ ते सायं ७ महिला वर्ग तर रात्री ७ ते सकाळी ७ पुरुष भक्त प्रहर देत होते. सर्व सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील रेणुकानगर येथे तसेच बस स्थानक आगार परिसरातही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आगारामार्फत उद्या बस चालक व कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे मुक्ताईनगरमध्ये तीन ठिकाणी दत्त जयंतीचा भक्तिमय उत्सव जल्लोषात पार पडला.

दत्त जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण शहर व जिल्हाभर भक्तीचा सण मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने आणि अध्यात्मिक वातावरणात साजरा झाला.

मुक्ताईनगर बस आगारात दत्त जयंती उत्साहात साजरी

भाविकांची मोठी गर्दी; सजावट, भजन कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

मुक्ताईनगर बस आगारात दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. आगार परिसरातील दत्त मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. बस आगारातील कर्मचाऱ्यांकडून मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.


सायंकाळी आठ वाजता भक्तीमय वातावरण निर्मिती करणारा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम बस आगारात आयोजित करण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी आगार प्रमुख निलेश कलाल, प्रभाकर मोरे, जितू चौधरी, एस.पी. नायसे, शशिधर कोठारे आदींनी विशेष परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.
दत्त जयंती उत्सवामुळे बस आगार परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.