दारूच्या नशेत व्यापाऱ्याला दगड घालून केले जखमी
जळगाव | प्रतिनिधी कुसुंबा गावातील आईस्क्रीम फॅक्टरीजवळ दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने व्यापाऱ्याला दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन अमृतलाल जैन (५४, रा. गणपतीनगर, कुसुंबा) हे कटलरी व्यवसायिक आहेत. २३ एप्रिल रोजी ते पत्नीसोबत आईस्क्रीम फॅक्टरी परिसरात गेले असताना, कृणाल पाटील (रा. कुसुंबा) हा दारूच्या नशेत त्यांच्या जवळ आला. “इथे काय करत आहात?” असे विचारून अचानक तेथे पडलेला दगड उचलून मदन जैन यांच्या डोक्यावर आणि नाकावर मारला.
या मारहाणीमध्ये मदन जैन गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पत्नीलाही दगड मारून जखमी करण्यात आले. इतकेच नाही तर, पोलिसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही कृणाल पाटीलने दिली.
या प्रकरणी मदन जैन यांनी २५ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कृणाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद पाटील करीत आहेत.