धरणगावात डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू:
वाळू तस्करीने घेतला आणखी एक बळी
धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगावात वाळूच्या अवैध वाहतुकीचा कहर सुरू असतानाच भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने सायकलस्वाराला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात 65 वर्षीय दत्तात्रय शंकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, वाळू तस्करीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी रात्री 7:30 वाजता दत्तात्रय पाटील हे जिनिंगमध्ये रात्रपाळीच्या कामासाठी सायकलवरून जात होते. त्याच वेळी जळगावकडून वाळूने भरलेला डंपर (MH04/FJ8083) भरधाव वेगाने धरणगावच्या दिशेने येत होता. महावीर जिनिंगसमोर या डंपरने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, डंपरने सायकल आणि सायकलस्वाराला तब्बल 500 मीटरपर्यंत फरफटत नेले.
माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, प्रतीक जैन आणि स्वप्नील भोलाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दत्तात्रय पाटील यांना ओळखून लगेच पोलिसांना माहिती दिली. शिवसैनिक पाटील यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या पाटील यांच्या मृत्यूची बातमी कळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली.
चालक फरार, पोलिसांचा शोध सुरू
अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. यासंदर्भात पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले की, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाळू तस्करीमुळे वाढते अपघात
धरणगाव आणि परिसरात वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाकडून सातत्याने कारवाईचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, वाळू तस्करीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.