जीएसटी व बाजार समिती सेसविरोधात व्यापाऱ्यांचा संप

0

जीएसटी व बाजार समिती सेसविरोधात व्यापाऱ्यांचा संप

दाणा बाजार बंद , कोट्यवधींची उलाढाल ठप्प

१७० हून अधिक व्यापाऱ्यांचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला जळगाव शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आपला तीव्र निषेध नोंदवला. दाणा बाजारातील सर्व दुकाने आज पूर्णपणे बंद राहिल्याने संपूर्ण परिसरात दिवसभर ओस पडलेले चित्र पाहायला मिळाले. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा बाजार आज ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर आधीच जीएसटी आकारला जात असताना त्यावर आकारला जाणारा बाजार समिती कर (सेस) त्वरित रद्द करावा, ऑनलाइन परवाना पद्धतीतील अडथळे दूर करून प्रक्रिया सुलभ करावी, तसेच इतर प्रशासकीय अडचणी दूर करून व्यापार सुसूत्र करावा अशा मागण्यांचा समावेश असून यावर व्यापारी आक्रमक झाले आहेत.

जळगाव दाणा बाजारातील १७० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या संपात ऐतिहासिक सहभाग नोंदविला. शहराच्या अर्थव्यवस्थेत कणा मानल्या जाणाऱ्या दाणा बाजारातील व्यवहार बंद राहिल्यामुळे केवळ व्यापारीच नव्हे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरही प्रत्यक्ष परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना माल खपवण्यासाठी पर्याय नसल्याने अनेकांना परत फिरावे लागले. व्यापाऱ्यांच्या या तीव्र एकदिवसीय आंदोलनाची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि मागण्या निकाली काढाव्यात, अशी अपेक्षा व्यापारवर्तुळातून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.