लोकशाही संपादकीय लेख
अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील धाराशिव, जालना, हिंगोली, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने झोडपले. अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाहून गेली. शेतांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. एकदा नव्हे तर दोनदा अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता तिसऱ्यांदा पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके तर वाहून गेलीच मात्र पाच जणांचा मृत्यू देखील झाला आहे. सुमारे 100 हून जास्त जनावरे पाण्यात वाहून गेली आणि मरण पावली. अनेक शेतकऱ्यांची घरे पडली. अनेक जण जखमी झाले, हताश झाले. त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करणाऱ्या महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्र्यांविषयी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री सरनाईक यांनी मदत देण्यासाठीच्या बॅनरवर स्वतःचे फोटो छापल्यामुळे शेतकरी आणखीन संतापले. “तुमची आम्हाला मदत नको.. तुम्ही येथून चालते व्हा..!” असा इशारा धाराशिवच्या शेतकऱ्यांनी दिला. एकही शेतकऱ्याने त्यांची मदत स्वीकारली नाही. हीच स्थिती जालना जिल्ह्यात आणि संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दिसून आली. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “आला आम्हाला भीक नको” अशी भूमिका घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपला स्वाभिमानी बाणा मंत्र्यांना दाखवून दिला. आधिच दुःखाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांकडून मंत्र्यांना जे उत्तर दिले त्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुकच केले पाहिजे. चिडलेल्या शेतकऱ्यांचा हा संताप पाहिला आणि मंत्र्यांना जे सुनावले ते पाहिले तर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांचा फार मोठा अपमानच या शेतकऱ्यांकडून केला गेला आहे. तोंडावर दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण असताना अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व काही उजाळून निघाले आहे. शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत. अशावेळी संतप्त शेतकऱ्यांचा संताप काय असतो? याचा अनुभव मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी अनुभवला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून महायुती सरकारला फार मोठी चपराक बसली आहे.
आधीच महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत जी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती बाबत ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आदी पिकांबाबत हमीभाव देण्याची घोषणा केली होती, त्याची पूर्तता न केल्यामुळे शेतकरी महायुतीच्या शासनाविरोधात चिडलेले आहे. अशातच त्यांना अस्मानी संकटाचा फटका बसला. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा जणू उद्रेकच झाला आहे. त्यातच पंचनामे करण्याचे आदेश मंत्र्यांनी बांधावर पाहणी करतानाच दिले असले, तरी पंचनामे करण्याची तत्परता दिसलेली नाही. मंत्र्यांची पाठ फिरली की स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याची जी तत्परता दाखवून व्हायला हवी, ती दाखवली जात नाही. हा आजचा नव्हे तर नेहमीचाच आणि कोणतेही सरकार सत्तेवर असो त्यांच्या काळात आलेला अनुभव आहे. जो दरवेळी येतो. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी बॅनरवर स्वतःचे फोटो लावून शेतकऱ्यांना मदत करण्याचा जो प्रकार केला, तो प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होय. या संदर्भातच खासदार संजय राऊत यांनी टिकीची झोड उठवली, तर आमचे मुख्यमंत्री म्हणतात की “फोटोचे काय घेऊन बसलात? मदत मिळते, ती शेतकऱ्यांना द्यावी..” एक शेतकरी पुत्र उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे. हा सर्व प्रकार पाहता राजकारण कोणत्या थराला गेले आहे, हे स्पष्ट दिसून येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व असे नुकसान झाले असताना त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जी शोबाजी चालली आहे, त्यातून शेतकरी वर्ग चिडलेला आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, तिथे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत त्यांच्या हातात मिळणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर मंत्र्यांना गावात गावकरी फिरू देणार नाहीत..!