दगडी बँकेची इमारत विक्री: आ. खडसेंचा गैरसमज दूर करणार – संजय पवार
इमारतीच्या विक्रीला संचालकांची बैठकीत संमती ; रेडीरेकनरच्या मूल्यांकनानंतरच अंतिम निर्णय
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवी पेठेतील शाखा अर्थात ‘दगडी बँक’च्या इमारतीच्या विक्रीला सर्व संचालकांनी संमती दर्शविली असून, रेडीरेकनरच्या मूल्यांकनानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पटरकरांशी बोलतांना दिली.
बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, घनश्याम अग्रवाल, विनोद पाटील, प्रदीप देशमुख, अॅड. रवींद्र पाटील, नाना राजमल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह महिला संचालिका उपस्थित होत्या. बैठकीत २६ विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
पारदर्शक पद्धतीने विक्री
नाबार्डच्या सूचनेनुसार, बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी बखळ जागेची विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दगडी बँकेच्या इमारतीचे मूल्यांकन करून ऑनलाइन निविदा प्रक्रियेद्वारे अत्यंत पारदर्शकपणे विक्री केली जाईल, असे संजय पवार यांनी स्पष्ट केले. मूल्यांकनानंतर प्रस्ताव पुन्हा संचालक मंडळासमोर ठेवला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीचा वापर
इमारत विक्रीतून मिळणारा निधी शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरला जाईल, असे पवार यांनी सांगितले. या रकमेतून ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या बँकेच्या इमारतींचे नूतनीकरण आणि नवीन इमारतींचे बांधकाम केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आ. खडसेंचा गैरसमज दूर करणार
जिल्हा बँकेचे संचालक आणि आमदार एकनाथ खडसे यांनी दगडी बँकेच्या इमारतीच्या विक्रीला विरोध केल्याच्या चर्चांवर बोलताना संजय पवार म्हणाले, “आ. खडसे यांच्याकडून कोणतेही अधिकृत पत्र अद्याप मिळालेले नाही. त्यांचा इमारत विक्रीबाबत काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेऊन तो गैरसमज दूर करू.”

