दादावाडीत दुचाकी चोरट्यांचा उच्छाद ; एकाच रात्री चार दुचाकी लंपास
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील दादावाडी परिसरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडत एकाच रात्रीत चार दुचाकी चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी १ डिसेंबर सकाळी उघडकीस आली. सलग चार वाहनांच्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या मालिकाबद्ध चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दादावाडी परिसराला लक्ष्य केले. सोमवारी सकाळी शैलेंद्र राजाराम आमोदकर यांच्या (एमएच १९ सीके ६९८१) क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याचे प्रथम निदर्शनास आले. मात्र, ही एकच घटना नसून त्याच रात्री आणखी तीन नागरिकांच्या दुचाकीही लंपास झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी अभय पारसमल जैन (एमएच २० एव्ही ०४७४), देविदास तुकाराम पाटील (एमएच १८ एएम १९८५) आणि अशोक दिगंबर पाटील (एमएच १९ बीडी ०२१०) यांच्या दुचाकी चोरून नेल्या. एकाच परिसरातून चार दुचाकी गायब झाल्याने चोरीचा हा प्रकार संगनमताने व नियोजनपूर्वक करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी शैलेंद्र आमोदकर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील पुढील तपास करीत आहेत.