आबा आणि आप्पांना लाभणार “राजयोग”

0

अचूक टायमिंगचे मिळणार फळ
पाचोरा | प्रतिनिधी नंदु शेलकर
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. सर्व काही सुरळीत होऊन ते आगामी काळात सत्तारूढ झाल्यानंतर चिमणआबा पाटील आणि किशोरआप्पा पाटील यांना मानाची पदे मिळण्याची शक्यता आहे. काल पहाटेपासून राज्यात नवीन राजकीय नाट्य सुरू झाले असून यातून ठाकरे सरकार गडगडणार असल्याचे आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. कालपासूनच जळगाव जिल्ह्यातील चिमणराव पाटील आणि किशोरआप्पा पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत होते. तर लताताई सोनवणे या आधी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, आज पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास सूरत येथून शिंदे आणि त्यांचे सहकारी गुवाहाटीला जाण्यासाठी निघाले असतांना हे तिन्ही आमदार देखील त्यांच्यासोबत दिसून आले.
चिमणराव पाटील यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी अनेकदा चर्चा होत होती. मात्र विस्तार होण्याआधीच ठाकरे सरकार पडण्याची शक्यता असून नव्या सरकारमध्ये शिंदे गटाला १५ ते २० मंत्रीपदे मिळू शकतात. यात चिमणआबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा बहुमान मिळेल अशी शक्यता आहे. पारोळा-एरंडोलमधील आबांच्या समर्थकांनी तर आतापासूनच सेलीब्रेशनची तयारी करून ठेवल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे किशोरआप्पा पाटील यांचे एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे संबंध लक्षात घेता ते सोबत गेल्याचा फारसा धक्का कुणाला बसला नाही. गेल्या काही महिन्यांपासून पाचोरा आणि भडगावच्या नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली असून याचे सर्वश्री श्रेय हे एकनाथ शिंदे यांनाच असल्याची बाब उघड आहे. यामुळे ते पहिल्याच फटक्यात शिंदे यांच्यासोबत गेले असून आगामी वाटचालीत त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली असता लवकरच गोड बातमी मिळेल असे सांगण्यात येत आहे.
चिमणआबा पाटील यांची शिवसेनेतील घुसमट कुणापासून लपून राहिलेली नव्हती. यामुळे एकनाथ शिंदे यांनी संकेत देताच त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांची साथ घेतली. तर किशोरआप्पा पाटील हे शिवसेनेत रिलॅक्स असले तरी शिंदे यांनी केलेली मदत आणि आगामी राजकीय वेध घेऊन त्यांच्या सोबत गेल्याचे दिसून येत आहे. अर्थात, या दोन्ही मान्यवरांनी अचूक वेळ साधली असून याचे फळ‌त्यांना नजीकच्या काळात मिळू शकते. तर आमदार लताताई सोनवणे यांना मतदारसंघातील कामे आणि महामंडळासारखे पदे देखील मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here