लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या तळघरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे घडली आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार, इमारतीच्या सेंट्रल एसी सिस्टमचे कामकाज सुरू असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे सर्वोच्च न्यायलयाची इमारत हादरली. काही वेळानंतर गोंधळ उडाला. स्फोटाचा आवाज ऐकताच वकील, न्यायधीश आणि इतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब न्यायालयाबाहेर धाव घेतली. काही काळ न्यायालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
स्फोट झाल्यानंतर काही मिनिटांतच बचाव पथके आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एसी प्लांटजवळ काम करणाऱ्या जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर, मृतदेह देखील शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात ऐकू आला. काही काळ तळघर धुराने भरले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक तपासणीनंतर स्फोटाचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कामकाजाला सुरवात केली. इमारतीला कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तळघरात असलेले कॅफेटेरिया केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याची माहिती आहे. याच ठिकाणी हा भीषण अपघात घडला. स्फोटामुळे कॅन्टिनच्या फर्निचरचं नुकसान झालं आहे. सध्या अधिक तपास सुरू आहे.