मुंबईपासून राज्यभर उत्सुकता; महापौर आरक्षणाचा काउंटडाऊन सुरू
राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनंतर महापौर पदाचे सत्तासमीकरण कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या आरक्षणाची सोडत कधी होणार, याबाबत स्पष्टता मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र नगरविकास विभागाने अधिकृत आदेश काढत ही प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सोडत गुरुवारी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालय, मुंबई येथील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेचे अध्यक्षपद माननीय राज्यमंत्री (नगरविकास) भूषवणार आहेत.
या सोडतीवर राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण काय निघते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरक्षण स्पष्ट होताच महायुतीतील अंतर्गत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता तारीख जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून आपापल्या पातळीवर राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. या सोडतीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंगही फुंकले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.