लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात काल रात्री एका शुल्लक कारणावरून दोन गटात राडा होऊन दगडफेक झाली. यात वाहनांची तसेच दुकानांची जाळपोळ केली गेली. या दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी पाळधीत तीन दंगा पथके आणि मोठा पोलिसांचा ताफा तैनात केला आहे.. काल रात्रीपासून ते एक जानेवारी २०२५ च्या रात्रीपर्यंत संचारबंदी झाली करण्यात आली आहे.. आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम जिल्हा पोलिसांनी सुरू केली आहे. जळगाव शहरातलगत धनगाव तालुक्यात असलेले पाळधी हे २५ ते ३० हजार लोक वस्तीचे गाव.. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांचे जन्मगाव.. गुलाबराव पाटलांचे पाळधी गावातील जनतेशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. तरीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती इथे अधून मधून डोके वर काढित असते.
गेल्या वर्षी पाळधीतून जाणाऱ्या एका धार्मिक यात्रेवर समाजकंटकांनी हल्ला करून अशाच प्रकारची दंगल घडवून आणली होती. गुलाबराव पाटलांनी मध्यस्थी करत दंगल आटोक्यात आणून शांतता प्रस्थापित केली होती. तरीसुद्धा २०२५ या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला किरकोळ शिल्लक कारणावरून दोन गटात दंगल व्हावी ही शरमेची बाब म्हणावी लागेल. नव्हे सर्वांना संताप आणणारी घटना म्हणावी लागेल. मंत्री गुलाबराव पाटील यांना पाळधीतील सर्वच ग्रामस्थ आपला नेता मानतात. गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधीत्व करत करत आहेत. गेली पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी करत होते. असे असताना त्यांच्याच पाळधी गावात दोन गटात दंगल होऊन संचारबंदी लागू होते. यामुळे गुलाबराव पाटलांपासून ते सर्वांना शरमेने मान खाली घालावी लागते. सकाळपासून ते दिवसभर महाराष्ट्रातील माध्यमांमध्ये ‘गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात दोन गटात दंगल : संचार बंदी जारी’ अशा आशयाचे वृत्त ठळकपणे झळकत असल्याने पाळधी गावाविषयी वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांचा परिवार जळगावातून पाळधी गावात त्यांच्या कारने येत होते. कार मुस्लिम मोहिल्यातून जात असताना रस्त्यात काही तरुणांचे टोळके उभे होते. म्हणून कार चालकाने हॉर्न वाजवला. कारचालकाने हॉर्न वाजवल्याच्या नंतरही हे टोळके रस्त्यातून हटले नाही. म्हणून कारचे दार उघडून गुलाबराव पाटलांच्या पत्नीने आवाज दिला की, ‘रस्त्यातून बाजूला व्हा..’ एवढे बोलल्या बरोबर तरुण टोळक्याने शिवीगाळ करून राडा केला, अशी एक बाजू सांगितली जाते. तर कारचा कट या तरुणांना लागला म्हणून त्यांनी शिवीगाळ केली आणि पुढील दंगल घडली, असे दुसऱ्या बाजूने सांगितले जाते. दोन्ही कारणे बघितली तर कारण अगदीच किरकोळ अन शुल्लक म्हणता येईल. एवढ्याशा शुल्लक कारणावरून दंगल घडवून आणावी, हे गुन्हेगारी प्रवृत्तीच करू शकते. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांना कसलाही धर्म नसतो, जात नसते. फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती तेवढी असते. त्यामुळे या समाजकंटकांना वेळीच ठेचून काढले पाहिजे. त्यांना असे ठेचावे की त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाही..
मंत्री गुलाबराव पाटील यांचे पाळधी गावात सर्वच समाजाच्या लोकांशी सलोख्याचे संबंध असताना पाळधी गावातून अधून मधून अशा खूप प्रवृत्तीच्या घटना का घडतात? याचे आत्म परीक्षण करण्याची गरज आहे. पाळधी गावातील बेरोजगार तरुणांच्या टोळक्यामुळे या घटना होतात. त्यासाठी त्यांच्या हाताला काहीतरी काम देऊन त्यांना गुंतवून ठेवणे आवश्यक असल्याची गरज निर्माण झाली आहे. हा उपाय करून पाहणे गरजेचे आहे. त्याउपर त्यांच्यात सुधारणा होत नसेल तर त्यांचे लांगूलचालन न करता त्यांना कायद्याचा बडगा दाखवावा. कायद्याच्या धाकामुळे हे रिकामटेकडे समाजकंटक गुन्हेगारी प्रवृत्ती पासून आपोआपच दूर होतील. अन्यथा हॉर्नच्या आवाजामुळे डोके भडकावून घेणारी ती ही तरुण मंडळी किंवा कारचा कट लागला म्हणून दंगल घडविणारे हे समाजकंटक असेच कुकृत्य करत राहतील.
आपल्या पाळधी गावचा लोकनेते गुलाबराव पाटील यांच्या कारचे कारण पुढे करून दंगल घडवितात. रस्त्यावरील वाहने जाळता दुकानांची तोडफोड करून दुकाने जाळतात, एवढ्या टोकाची कृत्य करतोय, याची त्यांना थोडी सुद्धा शरम वाटत नाही. ही बाब अत्यंत वाईट म्हणावी लागेल. तसेच अधून मधून अशी गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असेल, तर पोलिसांनी जरूर कायद्याचा बडगा दाखवून आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा पाळधी गाव स्फोटक बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाबरावांनी सुद्धा या टोळक्याच्या पालकांची भेट घेऊन वेळीच सूचना देऊन पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सुदैवाने जाळपोळीत काही जीवित हानी झाली नाही, अन्यथा काय अनर्थ घडला असता हे सांगता येत नाही. पाळधीचे हे तरुण टोळक्याचे प्रकरण गंभीरतेने घेण्याची आता खरी गरज आहे…!