कामिका एकादशी निमित्त संत मुक्ताई समाधी स्थळी गर्दी
भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती : मुक्ताईनगरला चक्क यात्रेचे स्वरूप
मुक्ताईनगर
काल मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई नवी मंदिर आणि कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिर येथे भाविकांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने दोघेही मंदिरात गर्दी केली होती. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की यात्रेचे स्वरूप मुक्ताईनगरला आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा व संत मुक्ताईचा जयघोष करीत काल हजारो भाविकांचे दर्शन घेतले.
आषाढी वारी नंतर येणारी कामिका एकादशीला अनन्य साधारण महत्त्व असून पंढरी परमात्मा श्री. विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतल्यानंतर संत दर्शनाला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व असते. त्या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश व खानदेशातील लाखो वारकरी व भाविक पायी दिंडी सोहळे, चार-चाकी, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर तसेच मिळेल त्या वाहनाने जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील नवी मुक्ताई मंदिर व आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी, येथे दर्शनासाठी येत असतात. काल एकादशी निमित्त आलेल्या भाविकांची व वारकऱ्यांनी सकाळी चार वाजेपासूनच भाविकांनी दर्शन बारीत गर्दी केली होती. लाखो भाविकांची मांदियाळी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे दिसून आली.मुक्ताईनगर मध्ये ठीक ठिकाणी दिंड्या चे स्वागत व फराळ वाटप करण्यात आले.
फराळाचे वाटप डॉ. विजय पाटील, नायगाव व जीवन चौधरी, बऱ्हाणपूर ज्यांच्याकडून करण्यात आले. दरवर्षी पेक्षा यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती दर्शनाच्या सायंकाळपर्यंत महिला व पुरुषांच्या तीन रांगा कायम होत्या. तसेच पोलीस बंदोबस्त चोख असून सुद्धा चोरीच्या घटना घडल्या आहेत गर्दीचा फायदा घेत जुने मुक्ताई मंदिर कोथळी येथे मंगलपोत चोरी झाले आहे.
संत मुक्ताई नवी मंदिर मुक्ताईनगर
मुक्ताईनगर शहरा जवळ असलेल्या संत मुक्ताई चे नवे मंदिर असून या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती तसेच या ठिकाणी विविध दुकाने सुद्धा लावण्यात आली होती सकाळी पाच वाजता अभिषेक महापूजा व आरती मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड रवींद्र पाटील व विनायक हरणे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली तसेच दिवसभर योगराज कंट्रक्शन चे संचालक उद्योजक विनोद सोनवणे यांच्याकडून चहाचे वाटप वारकऱ्यांना व भाविकांना करण्यात आले. डॉ प्रदीप पाटील संजीवनी हॉस्पिटल मुक्ताईनगर यांच्याकडून फराळ वाटप करण्यात आले.
संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी
आदिशक्ती श्री संत मुक्ताई कोथळी येथील मूळ मंदिरात सकाळी चार वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. सकाळी पाच वाजता किशोर रामभाऊ धुरळे वडोदा व उद्धव जुनारे महाराज यांच्या हस्ते अभिषेक महापूजा झाली तसेच वरणगाव येथील गौरव पाटील यांनी जुन्या मुक्ताई मंदिरात मूर्ती जवळ आकर्षक सजावट केली होती.